शिवसेनेची नवी पिढी भविष्यात पक्षाची सुत्रे हातात घेतील - संजय राऊत
By मनोहर कुंभेजकर | Published: November 19, 2023 02:47 PM2023-11-19T14:47:53+5:302023-11-19T14:50:11+5:30
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेचा वाघ ही घोषणा आणि महिलांना संबोधले जाणारे 'रणरागिणी' हे शब्द फक्त शिवसेनेतील शिवसैनिकांनाच शोभून दिसतात.
मुंबई : वयाच्या ३२व्या वर्षी विधानपरिषदेचे आमदार पद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनिल परब यांना दिले, वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी माझी निवड केली, तसेच वयाच्या ३१ व्या वर्षी वरूण सरदेसाई हे शिवसेनेचे सचिव झाले. यावरून शिवसेना नेहमी तरूण रक्ताला वाव देते हे सिद्ध होते असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काल रात्री जुहू काढले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभाग क्रमांक ४-५ व चांदिवली विधानसभेच्या वतीने अनिल परब यांची शिवसेना नेतेपदी, राजूल पटेल यांची शिवसेना उप नेतेपदी आणि वरुण सरदेसाई यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा जुहू येथील जेव्हीपीडी ग्राउंडवर आयोजित केला होता,त्यावेळी ते बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेचा वाघ ही घोषणा आणि महिलांना संबोधले जाणारे 'रणरागिणी' हे शब्द फक्त शिवसेनेतील शिवसैनिकांनाच शोभून दिसतात. सत्तेच्या लालसेपायी तिकडे गेलेल्या शिवसेनेतील ४० जणांना हिंदुस्थानच्या संविधानाच्या आधारे पदच्युत करण्याचे काम अँड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहे असे सांगत त्यांनी परब यांच्या कार्याचा गौरव केला.तर शिवसेनेत आता नवी पिढी कार्यरत होते आहे असे गौरवोद्गार वरूण सरदेसाई यांना संबोधून काढले.
या समारंभ प्रसंगी हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात व्यासपिठावर आमदार ऋतुजा लटके, रजनी मिस्त्री, आश्विनी मते, तसेच शैलेश फणसे, संजय कदम, सदा परब, प्रमोद सावंत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.