मुंबई/उस्मानाबाद - शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकताच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप पाहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात जिकडे-तिकडे याचीच चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही भगवं वादळ घोंगावू लागल्याचं दिसून आलं. शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्याचवेळी, शिवसेना नेते आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आमचं नवं चिन्ह म्हणत एक फोटो शेअर केला.
शिवसेनेसाठी सध्या संघर्षाचा काळ असून बड्या नेत्यांनी शिवसेना सोडल्यानंतर आता फक्त निष्ठावंत उतरल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यापूर्वीच म्हटलं होतं. शिवसेनेसोबत असलेल्या खासदारांपैकी सर्वात खंबीरपणे आपली भूमिका बजावताना उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर दिसून येत आहेत. दसरा मेळाव्यासाठी ओमराजे यांनी तुळजाभवानी एक्सप्रेस नावाने ट्रेन बुक केली होती. आपल्या मतदारसंघातील शिवसैनिक घेऊन ते शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी आले होते. तर, नुकतेच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची बातमी झळकताच काही मिनिटांत त्यांनी अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला. तसेच, आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याचंही सांगितलं.
शिवसेनेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटाचा रस्ता धरला. मात्र, उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या ६ खासदारांमध्ये उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर हे प्रामुख्याने दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांच्या मतदारसंघातील काहींचा प्रवेश शिवसेनेत करुन घेतला. तर, दसरा मेळाव्यातही त्यांचा सक्रीय सहभाग दिसून आला होता. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या संकटकाळात ते धडाडीने असल्याचे दिसून येत आहे.
आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते?
चिन्हाबाबत : धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल. त्यासाठी : शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटाने चिन्हांचेही तीन पर्याय पसंतीक्रमानुसार आयोगाला सोमवारी दुपारपर्यंत द्यायचे आहेत. त्याचा निर्णयही सोमवारी आयोग घेईल.
नावाबाबत : शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही.
त्यासाठी : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.