Join us

ठाकरे गटाची प्रतिज्ञापत्र बाद झाल्याची बातमी खोटी, आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 10:33 PM

Aditya Thackeray: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत.

मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. मात्र या प्रतिज्ञापत्रांपैकी उद्धव ठाकरे गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याचे वृत्त आले होते. मात्र उद्धव ठाकरे गटाने सादर केलेली प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याची बातमी खोटी असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आज आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांसमोर आले असता त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्रांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याची बातमी खोटी आहे. त्या बातमीच्या सोर्सवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरे यांच्या या विधानामुळे आता नेमकी खरी गोष्ट काय? याबाबत संभ्रम वाढला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दोन ट्रक भरून प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. ठाकरे गटाने ११ लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहीत नमुण्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्याने प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवलेल्या प्रतिज्ञापत्रांची संख्या तब्बल अडीच लाख असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र बाद होणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाभारतीय निवडणूक आयोग