मुंबई : अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीखाली जिलेटीनच्या कांड्या ठेवण्याचे नक्की कारण काय होते ते या घटनेचा तपास करणाऱ्या एनआयएने स्पष्ट केलेले नाही. एखाद्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हेगाराने गृहमंत्र्यांवर आरोप करणे व ते खरे-खोटे हे सिद्ध होण्यापूर्वी त्याला दोषी जाहीर करणे चुकीचे आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात सभागृहात फोडलेल्या ‘व्हिडिओ बॉम्ब’वर बोलताना ते म्हणाले की, अनिल देशमुख व त्यांच्याशी संबंधित लोकांवर आतापर्यंत ९० छापे घातले गेल्याकडे वळसे-पाटील यांनी लक्ष वेधले. एखाद्याला संपवण्याचेच हे प्रयत्न आहेत.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत कारवाई का केली नाही, असा सवाल वळसे-पाटील यांनी केला. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध मलिक यांनी आवाज उठवल्यामुळेच त्यांच्या विरोधात हेतुत: कारवाई केली.
सदावर्तेंचा पाठीराखा कोण?
एसटी कामगारांचे नेते असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका केली. यामध्ये कायदेशीर बाजू मांडणाऱ्या हरीश साळवे यांच्यासारख्या वकिलांची लक्षावधी रुपयांची फी कुणी दिली. त्यामुळे सदावर्ते यांचा पाठीराखा कोण, असा सवाल त्यांनी केला.
‘काश्मीर फाइल्सच्या निमित्ताने ध्रुवीकरण’
काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहणाऱ्या दर्शकांना चित्रपटानंतर बाजूच्या दालनात नेऊन हिंदू जनजागृती विशेष संवाद घडवून आणत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. समाजासमाजात अंतर वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.