हरवलेल्या ‘मनोरुग्णा’चे कुटुंब निर्भयाने शोधले; रुग्णालयात होतो, पाय कोणी कापला आठवत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:01 PM2022-02-10T12:01:55+5:302022-02-10T12:03:55+5:30
राणे हे त्यांचे सख्खे भाऊ बिलास यांच्यासोबत मालाड पश्चिमच्या एव्हरशाइननगर येथील उज्ज्वल नंदादीप सोसायटीमध्ये राहत होते. ते मनोरुग्ण असून, अविवाहित आहेत. घरातून अनेकदा ते निघून जायचे आणि परत यायचे. मात्र, २५ मार्च, २०२० रोजी ते असेच निघून गेले आणि परत आलेच नाहीत.
गौरी टेंबकर-कलगुटकर -
मुंबई: ‘मी मालाड रुग्णालयात होतो, माझा पाय कोणी कापला’ याबाबत काहीच आठवत नाही, असे सांगणाऱ्या सुहास भास्कर राणे (५५) या ‘मनोरुग्ण’ व्यक्तीला मालाड निर्भया पथकाने कुटुंबाची भेट घडवून आणली. मुख्य म्हणजे ते हरवले, तेव्हा त्यांचे दोन्हीही पाय शाबूत होते. मात्र, सापडले, तेव्हा त्यांचा एक पाय कापण्यात आल्याने त्यांना अपंगत्व आले होते. त्यानुसार, या दोन वर्षांत नेमके काय घडले, याची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.
राणे हे त्यांचे सख्खे भाऊ बिलास यांच्यासोबत मालाड पश्चिमच्या एव्हरशाइननगर येथील उज्ज्वल नंदादीप सोसायटीमध्ये राहत होते. ते मनोरुग्ण असून, अविवाहित आहेत. घरातून अनेकदा ते निघून जायचे आणि परत यायचे. मात्र, २५ मार्च, २०२० रोजी ते असेच निघून गेले आणि परत आलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. त्यामुळे बांगुरनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर, दोन वर्षांनी ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी १ वाजून ५८ मिनिटांनी मालाड पोलिसांच्या निर्भया पथकाला चिंचोली फाटकमध्ये बेवारस व्यक्ती सापडल्याचे समजले. तेव्हा अधू अवस्थेतील राणेवर त्यांनी उपचार करविले. महिला सहायक पोलीस निरीक्षक परुळे, पोलीस नाईक गणेश सावर्डेकर व पथकाने राणेंना विश्वासात घेत चौकशी केली, तेव्हा त्यांनी घरचा पत्ता सांगितला. बांगुरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पीयूष तरे यांच्या मदतीने मालाड पोलिसांनी राणेंना त्यांचा पुतण्या आदित्य राणे (३०)कडे सुखरूपपणे सोपविण्यात आले. त्यासाठी नातेवाइकांनी मालाड निर्भया पथकाचे आभार मानले.
दोन वर्षात काय घडले?
आमच्या पथकाला राणे सापडले तेव्हा त्यांचा उजवा पाय नव्हता. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, ते हरवले तेव्हा त्यांचे दोन्ही पाय शाबूत होते. दोन वर्षात नेमके काय झाले, याबाबत त्यांना काहीच आठवत नाही. त्यामुळे यादरम्यान त्यांना काही अपघात झाला होता का? किंवा अन्य काही कारणाने त्यांनी पाय गमावला? याची पुढील चौकशी बांगुरनगर पोलीस करत आहेत.
- धनंजय लिगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालाड पोलीस ठाणे