Join us

उत्तर मुंबईचा निकाल महायुतीला फलदायी, पाच मतदारसंघांत गोयल यांना आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 12:09 PM

२०१९ च्या विधानसभा निकालाप्रमाणे उत्तर मुंबईत सध्या दहीसर, बोरिवली, कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत.

मुंबई : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील यंदाचा निकाल महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फलदायी ठरणार असून महाविकास आघाडीच्या दृष्टीने मात्र डोकेदुखी वाढवणारा आहे. अपेक्षेप्रमाणे महायुतीचे वर्चस्व असलेल्या उत्तर मुंबईतील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांना भरघोस आघाडी मिळालेली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहापैकी पाचही विधानसभा मतदारसंघांत गोयल यांना अधिकचे मतदान मिळालेले आहे. त्यातही भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बोरिवली विधानसभा मतदारसंघातून गोयल यांना सर्वाधिक मतदान झाले आहे.

२०१९ च्या विधानसभा निकालाप्रमाणे उत्तर मुंबईत सध्या दहीसर, बोरिवली, कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. तर मागाठाणे या विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचा आमदार आहे. काँग्रेसकडे केवळ मालाड पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील आमदार आहे. यावरून उत्तर मुंबईत वर्चस्व भाजपचे आहे, हे सिद्ध होते. हे वर्चस्व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही कायम ठेवण्यात भाजपला यश आले असून शिंदेसेनेच्या आमदारांनीही आपल्या मागाठाणे मतदारसंघातून गोयल यांना भरघोस आघाडी दिली आहे.

पाच ठिकाणी लढत सोपीसुनील राणे यांच्या बोरिवली विधानसभा मतदारसंघातून तब्बल १,००,७७५ मतांची आघाडी गोयल यांना मिळाली आहे. मनीषा चौधरी यांच्या दहीसर विधानसभा मतदारसंघातून ६२,२४७, अतुल भातखळकर यांच्या कांदिवली पूर्व मतदारसंघातून ६९,९०५ आणि योगेश सागर यांच्या चारकोप मतदारसंघातून ७९,०९६ मतांची आघाडी गोयल यांना मिळाली आहे. तर शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघातून गोयल यांना ४५,९०८ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे या पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीसाठी आगामी लढत सोपी असेल असे चित्र आहे.

विधानसभेला काय चित्र? काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणाऱ्या भूषण पाटील यांना अपेक्षेप्रमाणे केवळ मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. या ठिकाणी अस्लम शेख हे काँग्रेसचे आमदार आहेत.  २०१९ची विधानसभा निवडणूक आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विधानसभा निहाय निकाल पाहता उत्तर मुंबईतील सहाही जागांवर लढत देणे महाविकास आघाडीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत जड जाणार आहे. 

टॅग्स :मुंबई उत्तरमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४पीयुष गोयल