मुंबई:
भाजप आमदार नितेश राणे यांनी मालवणी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांनी बजावलेली नोटीस चुकीची असल्याचे सांगत वकिलामार्फत उत्तर दाखल केले आहे. तसेच चांगल्या वर्तनाचा बंधपत्र (गुड बिहेवीअर बॉण्ड) भरण्यासही नकार दिला असल्याने याप्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह नीतेश यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने त्यांच्या अधिकारांतर्गत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नितेश यांनी वकील नमिता मानेशिंदे यांच्यामार्फत कारणे दाखवा नोटीसला उत्तर दाखल केले असून १ एप्रिल रोजी बजावलेली नोटीस चुकीची आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यावरील सुनावणी २० एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
काय आहेत आक्षेप?- प्रथमदर्शनी ही नोटीस बेकायदेशीर आणि चुकीच्या हेतूने जारी केली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ११०, गुन्हेगारांच्या चांगल्या वर्तनासाठी सुरक्षिततेशी संबंधित आहे. - सध्याच्या प्रतिवादीला कोणत्याही गुन्ह्यासाठी कधीही दोषी ठरवण्यात आलेले नाही, त्यामुळे हे कलम त्याला लागू होणार नाही आणि म्हणूनच, हे कलम लावणे चुकीचे आहे असे राणे यांचे म्हणणे आहे.