लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: साखळी खेचून गाडी थांबवण्याच्या घटनांमध्ये मध्य रेल्वेत गेल्या महिन्यात ९४१ इतक्या प्रकरणांची नोंद झाली असून रेल्वेने अशा घटनांमधील ७११ प्रवाशांवर विनाकारण साखळी खेचून गाडी थांबवल्याबद्दल कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे.
संकटकाळात प्रवाशांना साखळी खेचून गाडी थांबवण्यासाठी असणाऱ्या सुविधेचा गैरवापर केला जात असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. क्षुल्लक कारणासाठीही प्रवासी चेन पुलिंग करून गाडी रोखतात; मात्र यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होत असतो. गाड्यांच्या वेळांमध्ये विलंब सहन करावा लागतो. यंदा लग्नसराई आणि उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे प्रवासी संख्या वाढली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने शेकडो उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या आहेत.
- मे २०२३ या एका महिन्यात मध्य रेल्वेत ९४१ चेन पुलिंगच्या घटना नोंदल्या गेल्या तर त्यासंबंधात भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये एकूण ७११ प्रवाशांवर कारवाई केली आहे.
- या कारवाईत त्यांच्याकडून २ लाख ७१ हजार २०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग करू नका असे आवाहन केले आहे.
- कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्थानकावर पोहोचावे असेही सांगितले आहे.