Join us

रक्ताचे नाते निर्दयी कसे होऊ शकते ? बेवारस मृतदेह वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 10:12 AM

२० वर्षांत १ लाखाहून अधिक बेवारस मृतदेहांंना दिला अग्नी. 

मुंबई : शवगृहातून बेवारस मृतदेह ताब्यात घ्यायचा, शववाहिनीत ठेवून स्मशानाची वाट धरायची. कधी मुलगा...कधी बाप..तर, कधी भाऊ बनून मृतदेहांंना अग्नी द्यायचा. हा जणू दिनक्रमच मुंबई पोलिस दलातील अनेक पोलिस बजावताना दिसत आहेत. कोरोना काळातही जवळचे लांब झाले तेव्हाही पोलिसांचे हे कार्य सुरू होते.

मुंबई पोलिस दलातील अंमलदार ज्ञानदेव वारे (५२) यांनी त्याच्या २० वर्षांच्या सेवेत १ लाखाहून अधिक बेवारस मृतदेहांंना अग्नी दिला आहे. तर, कोरोनाच्या काळातही त्यांची ही सेवा थांबली नसून हातात ग्लोव्हज आणि तोंडाला फक्त मास्क असताना त्यांनी ५०० कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. त्यांच्यासारखे अनेक पोलिस अशा पद्धतीने सेवा बजावत आहेत. मुंबईत शेकडो बेवारस मृतदेह मिळून येतात. अशावेळी पोलिस त्यांना अग्नी देतात.

...तर पोलिसांशी संपर्क साधा 

 मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर बेवारस मृतदेहांची फ़ोटोसह माहिती देण्यात आली आहे. 

 तसेच, संबंधित व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई  पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांची शेवटपर्यंत साथ :

नातेवाइकांनी नाकारले अशा बेघर, निराधारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे या अनोळखी व्यक्तींवर पोलिस स्वतःच्या खिशातून खर्च करून अंत्यसंस्कार करतात. परिणामी, ज्याला कोणी नाही त्यांना जगाचा निरोप घेताना पोलिसांची शेवटपर्यंत साथ मिळत असल्याचे चित्र आहे.

किती दिवस पाहिली जाते वाट ? 

  मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिस साधारण ६ ते ८ दिवस वाट पाहतात. 

 सामान्यतः रेल्वे अपघातात ओळख पटविण्यात अडचणी येतात. 

 अन्य घटनांमध्ये कुटुंबीय सापडतात. मृतदेह कुजण्याच्या अवस्थेत असल्यास तत्काळ अंत्यसंस्कार केले जातात.

 अंत्यसंस्कारासाठी सामाजिक संस्थांना आवाहन केले जाते, तर काही प्रसंगांत पोलिस अनुदानातूनदेखील ते पार पाडले जाते.

टॅग्स :मुंबईमृत्यू