महिला रक्तदात्यांची संख्या कमी; काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:10 IST2025-02-03T12:07:25+5:302025-02-03T12:10:28+5:30
भारतामध्ये पुरुष तीन महिन्यांतून एकदा, तर महिला या चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात.

महिला रक्तदात्यांची संख्या कमी; काय आहे कारण?
मुंबई : जीवनात रक्तदानाचे खूप मोठे महत्त्व आहे. एखाद्या मोठ्या आजारात, अपघात झाल्यास, रक्तस्राव झाल्यास रुग्णाला मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. ही गरज ओळखून समाजात विविध सामाजिक संस्था, धर्मादाय संस्था, रक्तपेढी, राजकीय पक्षांच्या वतीने रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. मात्र रक्तदान करण्यासाठी महिलांची संख्या खूपच कमी असते. महिलांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांमुळे त्या रक्तदान करण्यास मोठ्या प्रमाणात पुढे येताना दिसत नाहीत.
भारतामध्ये पुरुष तीन महिन्यांतून एकदा, तर महिला या चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात. मात्र, महिलांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे.
महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. त्यामुळे सुदृढ महिलाही रक्तदान करण्यास घाबरतात. याशिवाय मासिक पाळी, प्रसूती, तणाव आदी प्रमुख कारणांमुळे रक्तदान करण्यासाठी महिला पुढे येत नाहीत.
व्यायाम, आहारावर लक्ष हवे
कुटुंबाच्या जबाबदारीमुळे महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांनी नियमित व्यायाम, आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.
हिमोग्लोबिन कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लोहाच्या गोळ्या घेतल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि इच्छुक महिला रक्तदानासाठी पात्र ठरतात, असे डॉ. महेश अभ्यंकर सांगतात.
रक्तदानाचे हे आहेत फायदे
रक्तदान केल्यामुळे आरोग्याचे अनेक फायदे आहेत. रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येत नाही. आजारी पडत नाही. रक्तदान केल्यानंतर नवीन रक्त तयार होते. तसेच त्यामुळे एक नवी ऊर्जा मिळते.
महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही. मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होत असल्यामुळे रक्तदान केल्यानंतर रक्त कमी होईल, असा गैरसमज स्त्रियांमध्ये असतो. त्यामुळे रक्तदानासाठी त्या इच्छुक नसतात. -डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्यमंत्री