मुंबई :
राज्यभरात शुक्रवारी दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा झाला. कोरोना संसर्गानंतरचा जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गोविंदा पथके सहभागी झाली होती. मुंबईत झालेल्या दहीहंडी उत्सवात संपूर्ण दिवसभरात २२२ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी १९७ जणांना उपचार करून घरी पाठवले, तर उर्वरित २५ जण रुग्णालयात उपचाराधीन आहेत.
विविध शासकीय आणि पालिका रुग्णालयात उपचाराधीन असणाऱ्या गोविंदांपैकी काही जणांना खरचटले आहे, कोणाचा पाय दुखावला, मुका मार लागला, खांदा निखळला, स्नायू दुखावले अशा तक्रारी आहेत. कुठल्या रुग्णालयात किती गोविंदा?पालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नायर रुग्णालयात १२, जे जे रुग्णालयात ५, सेंट जॉर्जेसमध्ये ५, जीटी रुग्णालयात १५, केईएम रुग्णालयात ५८, सायन रुग्णालयात १९, जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात २०, कांदिवली येथील डॉ. आंबेडकर रुग्णालयात १० जण दाखल झाले होते. कूपर रुग्णालयात १७, व्ही. एन. देसाई रुग्णालयात ८, राजावाडी रुग्णालयात २०, अगरवाल रुग्णालयात ५, वांद्रे भाभामध्ये ८, वरळीच्या पोद्दार रुग्णालयात ९ जण दाखल झाले होते.
गोवंडी शताब्दी रुग्णालयात ४, पोद्दार ९, स. का. पाटील रुग्णालयात २ आणि सावरकर रुग्णालयात १ गोविंदावर उपचार सुरू आहेत.