Join us  

आमच्या गटातील आमदारांची संख्या आणखी वाढणार; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 6:08 PM

बच्चू कडूंच्या विधानावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.

आमदार रवी राणा यांनी माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बच्चू कडू यांनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. 

बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणी करु नये. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले ७ ते ८ आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच एक नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास आपण धमाका करणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बच्चू कडूंच्या या विधानावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना या आमच्या गटातील आमचे ५० आमदारांची संख्या अजून वाढेल. पण ही संख्या कमी होणार नाही. आम्ही सर्व एकनाथ शिंदेसोबत आहोत. जे काही अंतर्गत मतभेद असतील ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून सोडवतील, असं शंभूराज देसाई म्हणाले.

...तर जशाच तसे उत्तर देवू- रवी राणा

आमदार बच्चू कडू जे काही करतात ते मला सांगायची गरज नाही. त्यांना सिद्धांत, विचार नाही. जे काही ते करतात, ते तोडपाणीसाठीच. दुसऱ्यांना दम देतात, गलिच्छ, बेछूट बोलतात. ते ज्या स्तरावर जातील, त्या स्तरावर मलाही जाता येते. मी खिसे कापून किराणा वाटप करतो, हे अगोदर सिद्ध करावे, असे आ. रवी राणा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. कडू यांचे आंदोलन तोडपाणीसाठीच असते. यापूर्वी सोफिया प्रकल्पाचे आंदोलन सर्वांनाच माहिती आहे. आमचे आंदोलन शेतकरी, गरिबांसाठी झाले, दिवाळीत जेलमध्ये गेलो, हा इतिहास आहे. आमदार कडूंनी अरेरावीची भाषा बंद करावी, मी धमकीला भीत नाही, असे थेट आव्हान रवी राणा यांनी दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बच्चू कडूरवी राणा