मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले!
By धीरज परब | Updated: January 8, 2025 07:51 IST2025-01-08T07:50:18+5:302025-01-08T07:51:39+5:30
मीरा रोडच्या रामदेव पार्क भागात अनंत एक्झॉरिया इमारतीत टोरेस ज्वेलरी शोरूम उघडण्यात आले होते

मीरा रोडमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली; आतापर्यंत २८ जणांना ६८ लाखांना फसवले!
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : ‘टोरेस ज्वेलरी’ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या संख्येचा आकडा वाढत आहे. नवघर पोलिसांनी युक्रेनच्या नागरिकांसह चार जणांवर गुन्हा दाखल करून कंपनीची बँक खात्यातील १ कोटी ७७ लाखांची रक्कम गोठवली आहे. दाखल गुन्ह्यात आतापर्यंत २८ जणांची ६८ लाखांची फसवणूक झाल्याचे नमूद आहे.
मीरा रोडच्या रामदेव पार्क भागात अनंत एक्झॉरिया इमारतीत टोरेस ज्वेलरी (प्लॅटिनीम हर्न प्रा. लि.) शोरूम उघडण्यात आले होते. नवघर पोलिस ठाण्यात फिर्याद देणाऱ्या कपिल उस्मानी यांना ५० हजार रुपये गुंतवून मोजोनाइट स्टोन खरेदी केल्यास दर आठवड्याला ५ हजार रुपये मिळतील, असे ५२ आठवडे पैसे मिळणार असल्याचे आमिष दाखवले. त्या आमिषाला भुलून कपिल यांनी त्यांच्या व पत्नीच्या नावे २ लाख ४८ हजार रुपये गुंतवले. ५ आठवड्यांत तब्बल ७४ हजार ६०० रुपयांचा बोनस त्यांना मिळाला. त्यामुळे त्याने आईच्या व पत्नीच्या नावे आणि २ लाख गुंतवले. अशाच प्रकारे अन्य २५ जणांनीही ४५ हजार रुपयांपासून २० लाखांपर्यंतची रक्कम गुंतवली आहे. या २८ जणांच्या फसवणुकीची दाखल गुन्ह्यातील एकूण रक्कम ६८ लाख ११ हजार रुपये इतकी आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.