खासगी शाळांचा एसटीसाेबत छत्तीसचा आकडा, सहली लटकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 07:59 AM2022-12-16T07:59:25+5:302022-12-16T07:59:40+5:30
मुंबईतून शून्य प्रतिसाद, आतापर्यंत केवळ ४५ करार
- सीमा महांगडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील अनेक पर्यटनस्थळे शैक्षणिक सहलींनी गजबजू लागली आहेत. शालेय सहली संदर्भात शिक्षण विभागाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या असून, सहली नेताना फक्त परिवहन मंडळाच्या एसटी बसने घेऊन जाव्यात, असे नमूद केले असताना, राज्यात अनेक खासगी शाळांकडून या सूचनेला बगल दिली जात आहे. विशेषतः मुंबई विभागात एसटीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत केवळ ४५ करार झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई आगारातून तर शैक्षणिक सहलींना शून्य प्रतिसाद मिळाला आहे.
एसटीचाच वापर करा !
राज्यात इतर जिल्ह्यांतून शालेय सहलींसाठी एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, मुंबईत खासगी शाळांची संख्या जास्त असल्याने तो मिळत नाही. तर दुसरीकडे शैक्षणिक सहलींसाठी शाळांना एसटीकडून ५० टक्के सूट देण्यात येत असून, एसटी महसुलात तर वाढ होतेच शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही घेतली जात असल्याने सहलींसाठी एसटीचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.
शैक्षणिक सहलींमुळे एसटीच्या उत्पन्नातही भर
दरवर्षी शैक्षणिक सहलींमुळे एसटी उत्पन्नात चांगली भर पडते. यंदाही महामंडळाकडून शाळांना ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि सुरक्षितता याची हमी दिली जात असल्यामुळे खासगी शाळांनीही एसटी महामंडळाचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन राज्य परिवहन मंडळाकडून होत आहे.
स्वत: च्या स्कूल बस वापरण्याचा ‘त्यांचा’ आग्रह
शिक्षण विभागाने जारी केलेल्या २६ प्रकारच्या सूचनांमध्ये शाळांनी सहलीसाठी एसटीलाच प्राधान्य द्यावे, या नियमांचा ही समावेश आहे. मात्र, खासगी शाळांचा स्वत: च्या बस सहलीसाठी वापरण्याचा आग्रह आहे.
सहलीसाठी स्कूलबसची परवानगी मिळणार नाही म्हणून काही खासगी शाळा तर विनापरवानगी सहली काढत आहेत.
एकीकडे अशा सहलींची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची असल्याने यंदा शाळांचा सहली काढण्याबाबत प्रतिसाद कमी होण्याची शक्यता मुख्याध्यापकांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई विभागातील कराराची माहिती
आगार संख्या
मुंबई ०
परळ ५
कुनेन ४
पनवेल ३३
उरण १
एकूण ४३