चाचण्यांची संख्या वाढविणार, मुंबई पालिकेची १६ रुग्णालये सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 08:47 AM2023-12-22T08:47:28+5:302023-12-22T08:47:36+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत साडेपाच हजार बेड राखीव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे महिनाभरात ३४ रुग्ण आढळले असून, २० दिवसात रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. कोरोनाच्या नव्या ‘जीएन-वन’ व्हेरिएंटचा शिरकाव राज्यात झाल्याने मुंबई महापालिका कमालीची सावध झाली आहे. या महिन्यात मुंबईत आढळलेल्या सर्व ३४ बाधितांची ‘जिनोम सिक्वेसिंग’ करण्यात येणार असून, दररोज होणाऱ्या एक हजार चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून १६ पालिका रुग्णालये, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सुमारे साडेपाच हजार बेड सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
ओमायक्राॅनच्या नव्या उपप्रकाराचे रुग्ण आढळत असले तरी मुंबईत कोरोना संसर्गाचा कोणताही वाढता धोका नसून मागील चार महिन्यांत मुंबईत कोरोनामुळे केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गंभीर परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी पालिकेची तयारी आहे, अशी ग्वाही देत कोरोना रोखण्यासाठी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती गुरुवारी मुंबई महापालिकेचे अपर आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
श्वसनाचा आजार असलेल्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गाच्या बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या मुंबईत दर महिन्याला एक हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात सर्वाधिक भर आरटीपीसीआर चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. पालिकेची १६ रुग्णालये व सेव्हन हिल्स रुग्णालयासह ५,५०५ बेड्स व औषधांचा साठा उपलब्ध असल्याचे डॉ. शिंदे यांनी सागितले.
२० दिवसांत रुग्णसंख्या तिप्पट
गरज भासल्यास ११४ खासगी रुग्णालयांमध्येही बेडची व्यवस्था करणे शक्य होईल. मुंबईत गेल्या महिनाभरात दररोज एक हजार चाचण्या होत असून यामध्ये ३४ जण कोरोना बाधित आढळले. ज्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यात सर्वाधिक ८० टक्के रुग्ण उच्चभ्रू वस्तीतील असून उर्वरित झोपडपट्टीमधील आहेत. २० दिवसांत रुग्ण संख्येत तिपटीने वाढ झाली आहे.
सध्या मास्क सक्ती नाही
मुंबईत अजूनही कोरोना रुग्णवाढ पूर्ण नियंत्रणात असल्यामुळे मास्क वापरण्याची सक्ती करणे तूर्तास तरी गरजेचे नाही. शिवाय सोशल डिस्टन्सिंग, सक्तीच्या चाचण्या किंवा विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानकांवर स्क्रिनिंग करण्यात येणार नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.