Join us

वेशीवेशीवर बदलतोय गौरी-गणपतीचा नैवेद्य, पूजेत जसे वैविध्य तसे नैवेद्यातही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 1:37 PM

Ganesh Mahotsav: गौरीच्या पूजेत जसे वैविध्य आहे, त्याचप्रमाणे नैवेद्यही विविध खाद्यपदार्थांचा दाखवला जातो. त्यात मग शाकाहारी, गोड, तिखट पदार्थांचाही समावेश आहे. कोकणात घावन घाटले, देशावरची पुरणपोळी याशिवाय तर काही ठिकाणी कथली आंबील, सोळा प्रकारच्या भाज्या असतात.

- स्नेहा मोरेमुंबई : एकीकडे गणेशोत्सवाची तयारी अखेरच्या टप्प्यात आली असताना बाप्पासोबतच येणाऱ्या गौराईच्या स्वागताचीही लगबग सुरू आहे. घरोघरी या माहेरवाशिणीचे विविध रूपांमध्ये स्वागत करत पाहुणचार केला जातो. गौराईच्या या सणाचे विशेष म्हणजे, अगदी वेशीवेशीवर या माहेरवाशिणीच्या पूजेची पद्धत, नैवेद्य बदलतो. मात्र दरवर्षी लाडक्या गणरायासह ‘आली गौराई अंगणी..’ म्हणत लहानथोर तिची मनोभावे सेवा करतात.गौरीच्या पूजेत जसे वैविध्य आहे, त्याचप्रमाणे नैवेद्यही विविध खाद्यपदार्थांचा दाखवला जातो. त्यात मग शाकाहारी, गोड, तिखट पदार्थांचाही समावेश आहे. कोकणात घावन घाटले, देशावरची पुरणपोळी याशिवाय तर काही ठिकाणी कथली आंबील, सोळा प्रकारच्या भाज्या असतात.

गौरीचा ओवसा- कोकणात गौरी पूजनाच्या दिवशीच ‘गौरीचा ओवसा’ भरण्याची पद्धतही आहे. ओवसा हा ‘वसा’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. -  वसा म्हणजे व्रत होय. गौरीचा फळाफुलांनी भरलेला हा सुपांचा ओवसा कोकणात साजरा केला जातो, त्याच दिवशी रात्री गौरीला फलाहार दाखविला जातो. - कोकणातच काही ठिकाणी तसेच तिखटाचा म्हणजे वडेसागुती, अळुवडीचा नेवैद्य दाखविण्याचीही प्रथा आहे. -  तर विसर्जनाच्या दिवशी भाकरी आणि शेगुलाच्या भाजीचा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी केली जाते.

पातोळ्या, मोदककोकणातल्या गौरींना पहिल्या दिवशी तांदळाची भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. तर दुसऱ्या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्या, भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात नैवेद्यासाठी उकडीचे मोदक विशेष असतात. 

फ्रोजन मोदक... मोदकाचे आइस्क्रीम बऱ्याच ठिकाणी फ्रोजन मोदकही पुरवले जातात. जे आपण वाफवून किंवा तळून वापरू शकतो. त्याचे वजन, सारण आणि आकारमानानुसार त्यांचे दर ठरतात. तसेच उकडीच्या मोदकाचे आइस्क्रीमदेखील बाजारात उपलब्ध असून त्याचीही क्रेझ वृद्ध माणसांपासून बच्चे कंपनीतही पाहायला मिळते. 

कथली अन् फुलोराकथली म्हणजे कढी. ताकाच्या कढीत हरसुल आणि पडवळ या भाज्या घालतात, त्यांना वेगळे महत्त्व असते. फुलोरा हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. फुलोरा म्हणजे करंजी, शंकरपाळे, लाडू, अनारसे, मोदक बनवून त्याचा फुलोरा बांधला जातो, मग गौरीचा प्रसाद म्हणून लहान मुलांना दिला जातो. 

सांजोऱ्या-करंज्यागौरीच्या आगमनाच्या दिवशी त्यांना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी या दिवसांमध्ये कांदा-लसूण खात नाहीत. त्यामुळे नैवेद्यातील सर्व पदार्थ कांदा-लसूण विरहित बनवले जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करून महालक्ष्मीला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबतच मोदक, करंज्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा बनवला जातो.

दहीभात, मुरडीचे कानोलेमराठवाडा, खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रातही साधारणपणे याच पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो. मराठवाड्यात साखरेची पुरणपोळी जास्त प्रमाणात केली जाते, तर विदर्भात पुरणपोळीसाठी गुळाचा वापर केला जातो. गौरी विसर्जनाच्या दिवशी दहीभात, मुरडीचे कानोले यांचा नैवेद्य दाखवला जातो.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई