एकच गुन्हा, राष्ट्रवादी पुन्हा... गुंड गज्या मारणेच्या पत्नीच्या NCP प्रवेशानंतर भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 01:53 PM2022-02-17T13:53:33+5:302022-02-17T13:56:25+5:30
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येणार असा दावा राष्ट्रवादीने यापूर्वीच केला आहे.
पुणे - मनसेतील पुण्याच्या माजी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मनसेच्या माजी नगरसेविका आणि गुंड गज्या मारणे (Gajanan Marne) याच्या पत्नी जयश्री मारणे (Jayashri Marne Join NCP) यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हा प्रवेश झाला आहे. त्यामुळे, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येणार असा दावा राष्ट्रवादीने यापूर्वीच केला आहे. तर, जयश्री मारणे यांच्या प्रवेशानंतर आणखी 16 नगरसेवक पुढील महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय. दरम्यान, जयश्री मारणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. एकच गुन्हा राष्ट्रवादी पुन्हा... असं खोचक ट्विट भातखळकर यांनी केलंय.
दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी शहर कार्यालयात मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पण आता या त्यांच्या प्रवेशाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण जयश्री मारणे या पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या पत्नी आहेत. गज्या मारणे हा सध्या मोक्का कारवाई अंतर्गत तुरुंगात आहे. पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्यामुळे भाजप हा मुद्दा उचलून धरत आहेत. त्यातूनच, भातखळकर यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
दरम्यान, गुन्हा हा गज्या मारणेच्या पतीवर आहे, त्यांच्यावर नाही असे सांगत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली आणि जयश्री मारणेंच्या प्रवेशाचे समर्थन केलं आहे.