मंत्री भागवत कराडांपुढे एकच सवाल ७.५ कोटींचे घर घ्यायचे की नाही? स्पेशल ट्रीटमेंट नाही, म्हाडाकडून लवकरच पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:55 PM2023-09-14T12:55:41+5:302023-09-14T12:55:50+5:30
Bhagwat Karad MHADA Home: आर्थिक कारण देत बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी म्हाडाचे ताडदेव येथील साडेसात कोटींचे घर परत केल्यानंतर आता वेटिंग लिस्टवरील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे या घराचे दावेदार आहेत.
मुंबई : आर्थिक कारण देत बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी म्हाडाचे ताडदेव येथील साडेसात कोटींचे घर परत केल्यानंतर आता वेटिंग लिस्टवरील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे या घराचे दावेदार आहेत. म्हाडाकडून दोन दिवसांत वेटिंग लिस्ट जनरेट करत संबंधितांना पत्र पाठविले जाईल. पत्रावर भागवत कराड यांना घर घेणार की परत करणार ? याबाबतचे उत्तर द्यायचे आहे. कराड यांनीही जर घर परत करण्याचा निर्णय घेतल्यास साडेसात कोटींचे घर पुढील लॉटरीत जमा केले जाईल.
म्हाडाने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ४ हजार ८२ घरांसाठी लॉटरी काढली. लॉटरीत लोकप्रतिनिधी या कॅटेगिरित नारायण कुचे यांना साडेसात कोटी रुपयांचे घर लागले. भागवत कराड हे प्रतीक्षा यादीवरील विजेते होते. अनुसूचित जाती प्रवर्गातील घरासाठीही कुचे विजेते होते.
कराडांसंबंधातील प्रक्रिया नियमानुसारच
विजेत्याने घर नको असे कळविले तर वेटिंगवरील अर्जदार पुढे सरकतो.
मात्र, त्यालाही घर घेणे जमले नाही तर मात्र ही घरे इतर वर्गवारी किंवा पुढील लॉटरीत टाकण्याची प्रक्रिया म्हाडाकडून केली जाते.
त्यामुळे भागवत कराडांना यांना स्पेशल ट्रीटमेंट नाही. नियमानुसार ही कारवाई केली जाते, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.
कॅटेगिरी कोणती : लोकप्रतिनिधी
कुठे आहे घर : क्रिसेस टॉवर, बी.बी. नकाशे मार्ग, एम.पी.मिल कम्पाउंड, ताडदेव, मुंबई ३४
घराची किंमत : ७ कोटी ५७ लाख ९४ हजार २६८ रुपये
आर्थिक उत्त्पन्न गट : उच्च
भागवत कराड बोलेनात
म्हाडाचे घर घेणार की परत करणार ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने भागवत कराड यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र, कराड यांनी काही प्रतिसाद दिला नाही.
किंमत माहीत नव्हती का?
नारायण कुचे यांनी घर परत केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
कुचे यांनी अर्ज केला तेव्हा त्यांना घराची किंमत माहीत नव्हती का ? जर घराची किंमत माहीत होती तर अर्जच का केला ?