Join us

पुतळा हटवल्यावरुन विरोधक आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 1:01 PM

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र सदनातील ही घटना निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली

मुंबई - राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. जंयती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सदन सजवण्यात आलं होतं. यावेळी, सभागृह हॉलमधी परिसरात अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे काही वेळेसाठी जागेवरुन हटवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आता, या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनीही या घटनेवरुन सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र सदनातील ही घटना निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. तसंच, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही या घटनेवरुन सरकारला प्रश्न विचारले आहेत. त्यावरुन चांगलंच राजकारण तापलं असताना, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. 

सर्वच महापुरुषांचा आदर आहे. सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या आम्हाला पूजनीय आहेत, प्रत्येक देशवासीयांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचा अनादर कुठेही होणार नाही. मी स्वत: महाराष्ट्र सदनमधील संबंधित अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बोललोय, आता ते स्वत:च या घटनेचा खुलासा करणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. तर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही याप्रकरणी आपली भूमिका मांडताना मी, या घटनेची माहिती घेऊन बोलेन असं म्हटले.

जयंत पाटील यांची तीव्र शब्दात नाराजी

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात हीच सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्तुत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे, हे महाराष्ट्राला कळले आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 

 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुख्यमंत्रीसावित्रीबाई फुले