Join us

'५० खोके घेऊन ओक्के', विरोधकांच्या घोषणा; एकनाथ शिंदेंची एन्ट्री अन् शंभूराज देसाई मागून म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 2:15 PM

विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली भूमिका अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी दाखवून दिली.

मुंबई- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा... अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा...ईडी सरकार हाय हाय... या  सरकारचं करायचं काय...खाली डोकं वर पाय... आले रे आले ५० खोके आले...खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली भूमिका अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी दाखवून दिली.

विरोधकांकडून घोषणा सुरु होत्या. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील आणि भाजपाचे अनेक आमदार विधानभवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विधानसभेच्या बाहेर आले. त्यावेळी देखील ५० खोके घेऊन ओक्के, अशा घोषणा सुरु होत्या. एकनाथ शिंदेंच्या मागे मंत्री शंभूराज देसाई देखील होते. त्यावेळी तुम्हाला पाहिजे का?, असा प्रतिसवाल शंभूराज देसाई यांनी केला.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. यावेळी सत्ताधारी पक्षातील सुधीर मुनगंटीवार विधानभवनात जात असताना धनंजय मुंडे यांनी "सुधीरभाऊंना कमी दर्जाचं खातं देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो", अशी घोषणाबाजी केली आणि विरोधीपक्षातील सर्व आमदारांनीही पाठिंबा देत सत्ताधाऱ्यांना डिवचलं. इतकंच नव्हे, तर शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट दिसताच धनंजय मुंडे यांनी संजय शिरसाट यांना मंत्रीमंडळात स्थान न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली. तर आशिष शेलार येताच शेलारांना मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. 

दरम्यान, विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर काही वेळ कामकाज झाले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेंकर यांनी सभागृहाची बैठक स्थगित होत असल्याचे सांगितले. आता उद्या गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता विधानसभेची विशेष बैठक सुरू करण्यात येणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हे गद्दारांचं सरकार- माजी मंत्री आदित्य ठाकरे

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे. हे गद्दारांचं सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू. आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभा आहोत. हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

टॅग्स :एकनाथ शिंदेशंभूराज देसाईमहाराष्ट्र सरकार