Join us

जेजेतील चित्रीकरणाच्या ‘पॅकअप’चे आदेश! वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:01 AM

जे. जे. रुग्णालय परिसरात सुरू असलेले चित्रीकरण तातडीने थांबविण्याचे आदेश बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले.

संतोष आंधळे , मुंबई :जे. जे. रुग्णालय परिसरात सुरू असलेले चित्रीकरण तातडीने थांबविण्याचे आदेश बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. गेल्या आठवड्यात रुग्णालय परिसरातील कँटीननजीक न्यायालयीन कामकाजाचा देखावा उभारण्यात आला होता. त्यामुळे रुग्णांची तसेच त्यांना भेटावयास येणाऱ्या नातेवाइकांची गैरसोय होत होती. चित्रीकरणाला दिलेल्या परवानगीमुळे डॉक्टर, रुग्ण, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. 

जे. जे. रुग्णालय परिसरात चित्रीकरणासाठी मोठा जामानिमा करण्यात आल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. वस्तुत: शासकीय रुग्णालयांत चित्रीकरणाला परवानगी न देण्याचे संकेत आहेत. यासंदर्भातील वृत्तही लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने चित्रीकरण थांबविण्याचे आदेश बुधवारी दिले. 

जे जे रुग्णालयातील परिसरात एका कंपनीला चित्रपट चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यांना चित्रीकरणासाठी जो अवधी देण्यात आला होता, तो आता संपला असला तरीही चित्रीकरण सुरूच असल्याने तत्काळ चित्रीकरण थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यासंदर्भातील तसे पत्रही त्यांना बुधवारी देण्यात आले आहे. - डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

शासकीय रुग्णालयांत चित्रीकरणाला परवानगी न देण्याचे संकेत आहेत. याचेही सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले.चित्रीकरणासाठी साडेपाच लाख रुपये शुल्क आकारण्यात आले होते. तसेच व्हॅनिटी व्हॅन आणि जनरेटरही या ठिकाणी तैनात आहेत. जुन्या काळात कैद्यांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या, ॲम्बेसेडर कार, प्रकाशयोजना या सर्वांची तजवीज चित्रीकरण स्थळावर केली होती. 

रुग्णालय परिसरातील सेंट्रल कँटीनशेजारी असणाऱ्या बॉईज कॉमन रूम या ठिकाणी न्यायालयीन कामकाजाचे स्थळ निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे चित्रीकरणावेळी रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी यांना कँटीनमध्ये शांतता ठेवावी लागत असे. तसेच काही काळ रस्ताही बंद करण्यात येत होता. या सर्व गोष्टींमुळे रुग्णालय परिसरात नाराजीचे वातावरण होते. याची दखल घेऊन चित्रीकरण थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :मुंबईजे. जे. रुग्णालयगोळीबार