घर रिकामे करण्यास नकार दिल्याने मालकाने संपवलं जीवन, भाडोत्री दाम्पत्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 01:45 PM2023-09-12T13:45:34+5:302023-09-12T13:54:09+5:30
Mumbai Crime News: भाडेतत्त्वावर ठेवलेल्या जोडप्याने घर रिकामी केले नाही. उलट मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली. भाडोत्रीच्याच त्रासाला वैतागून अखेर घरमालकाने गळफास लावून घेतला.
मुंबई - भाडेतत्त्वावर ठेवलेल्या जोडप्याने घर रिकामी केले नाही. उलट मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली. भाडोत्रीच्याच त्रासाला वैतागून अखेर घरमालकाने गळफास लावून घेतला. ही दुर्दैवी घटना अंधेरीच्या सहार गावात घडली. राल्फ रोड्रिक्स नामक (४०) असे मृताचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून एजंट, भाडोत्री दाम्पत्यासह ७ जणांविरोधात सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार रिनोल्डो रोड्रिक्स (४३) हे राल्फचे चुलत भाऊ असून ते अंधेरीच्या सहार गावात राहतात. राल्फ याने राहत्या घराच्या माळ्यावरील घर जानेवारी २०२१ मध्ये भीमसेन गोकुळे याला भाडेतत्त्वावर दिले होते. काही कारणांमुळे त्याने नोव्हेंबरमध्ये घर खाली करण्यास सांगितले. मात्र. गोकुळे याने घर खाली करण्यास नकार दिला.
ॲग्रिमेंटमध्ये दलालांची हेराफेरी
एजंट कॅमील घोंसालविस, इम्तियाज शेख, सुरेंद्र चौहान, नीलेश निकाळजे व अलेक्स व्हॅलेंटाईन एंथनी डिसुजा यांनी खोटे ॲग्रिमेंट बनवून गोकुळे दाम्पत्याला हेवी डिपॉझिटवर घर दिले आणि राल्फ याला त्यांनी केवळ भाडेतत्त्वावर घर दिल्याचे कागदपत्र दिले. हेवी डिपॉझिटचे पैसे एजंटकडे दिल्याने गोकुळे रूम रिकामी करत नव्हता, अशी माहिती आत्महत्येपूर्वी राल्फ याने दिल्याचे रिनोल्डो यांने सांगितली.
पोलिसांची माहिती
राल्फला नैराश्य आले. त्यातच गोकुळेची पत्नी ज्योती ही देखील वारंवार पोलिस ठाण्यात जाऊन त्याच्याविरोधात तक्रार देऊ लागली. त्यामुळे तो अधिकच निराश झाला.
अखेर ९ सप्टेंबर रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेची माहिती प्राप्त होताच सहार पोलिस घटनास्थळी पोहोचले. आत्महत्येपूर्वी राल्फने इंग्रजीत लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना पंचनामा करताना सापडली.
त्याने सर्व दलाल आणि गोकुळे दाम्पत्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.