सरकारने कठोर पावले उचलल्याशिवाय पेपरफुटी प्रकरण बंद होणार नाही;अंबादास दानवेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:56 PM2024-02-29T12:56:03+5:302024-02-29T12:56:38+5:30
राज्यातील परीक्षा घोटाळ्यावर श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी करत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
मुंबई: सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस असून विरोधकांनी पेपरफुटी प्रकरणावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राज्यातील परीक्षा घोटाळ्यावर श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी करत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
सरकारने कठोर पावले उचलल्याशिवाय हे पेपरफुटी प्रकरण बंद होणार नाही, असं विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. रोज पेपरफुटीचे प्रकार होत आहेत. या महाराष्ट्रात एक रॅकेट कार्यरत आहे आणि हे रॅकेट पेपट फोडत आहेत. विद्यार्थांना लाखो रुपयांना पेपर विकतात, मग विद्यार्थी परीक्षा देतात असे विद्यार्थी पास होतात आणि हुशार विद्यार्थी नापास होतात किंवा मागे राहतात, असं अंबादास दानवेंनी सांगितले. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली होती. उत्तर प्रदेश सरकारने तातडीने सर्व परीक्षा रद्द केल्या, असंही अंबादास दानवे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील परीक्षा घोटाळ्यावर श्वेत पत्रिका काढावी, सर्व परिक्षा एमपीएससी (MPSC) मार्फत घ्याव्यात, राज्यात सतत होणाऱ्या पेपरफुटीने विद्यार्थी त्रस्त असून सरकार मात्र फोडाफोडीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. तलाठी भरती परीक्षेची एसआयटी चौकशी व्हावी, यासह अन्य मागण्यांचे फलक घेऊन विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. पेपरफुटीमुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होते. महाराष्ट्रात पेपरफुटीचं रॅकेट सक्रीय आहे. राज्यातील परिक्षा घोटाळ्याबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.