मुंबई : ऐन पावसाळ्यात सखल भागात पावसाचे पाणी साचू नये म्हणून मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच प्राधिकरणे कामाला लागली असून, आता तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: रस्त्यांची कामे करण्यासह खड्डे भरण्याचे आदेश देतानाच जेथे बॅरिकेट्सची गरज नाही, असे बॅरिकेट्स हटविण्याच्या सूचनाही महानगर आयुक्त्यांनी दिल्या आहेत. महापालिका, मेट्रो ३ सारखी प्राधिकरणेही मान्सूनसाठी सज्ज असतानाच दुसरीकडे मुंबईतील पावसाचा पॅटर्न बदलत असल्याने कमी वेळेत जास्त पडणाऱ्या पावसामुळे आता सगळ्याच प्राधिकरणांचा कस लागणार आहे.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध संस्थांशी समन्वय साधून तत्काळ तक्रार निवारणावर भर दिला आहे. मान्सूनदरम्यान रस्त्याचे काम आणि खड्डे भरण्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रतिसाद पथके, व्हॅन्स, कंट्रोल रूम आणि पाणी तुंबलेल्या भागांसाठी पंप, रात्रीची तपासणी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे निरीक्षण, समर्पित यंत्रणा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महत्त्वाच्या ठिकाणांसाठी पथके, अनावश्यक बॅरिकेट्स काढून टाकणे आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करणे, पावसाळ्यात लोकांची आणि वाहनांची गैरसोय टाळणे आणि उद्भवू शकणाऱ्या संभाव्य समस्या कमी करण्याकडे लक्ष द्या, असे त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बजावले.
काय आहेत निर्देश? सभागृहे, शाळा किंवा तत्सम निवारे उपलब्धता याबाबत तयारी करून ठेवा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तयार ठेवा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी सतर्क राहा एनडीआरएफ, एसडीआरएफशी संपर्क-समन्वय राखा हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत सतर्क राहा
यंत्रणा ॲक्शन मोडवर
हाय टाईड पावसाळ्यातील १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळातील मोठी भरती (हाय टाईड) च्या ५६ दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
६ हजार ४०० कॅमेरेमुंबईतील परिस्थितीवर महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून ६ हजार ४०० कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.
सहा तासांत खड्डे बुजणार महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जे खड्ड्यांची माहिती मिळताच, पुढच्या सहा तासांत खड्डे बुजवतील, असे नियोजन आहे.
५०० पंप : पाणी तुंबू नये यासाठी सुमारे ५०० पंप सज्ज ठेवण्यात आले आहेत. सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
ढगफुटी म्हणजे काय?लहान परिसरात कमीत कमी वेळेत अधिकाधिक पाऊस पडणे म्हणजे ढगफुटी होय, अशी ढगफुटीची व्याख्या आहे. अशावेळी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्याला ढगफुटी म्हटले जाते. म्हणजे कमी वेळात खुप पाऊस पडणे होय.