फेरीवाले आता पोलीस आयुक्तांच्या रडारवर; शाळा परिसर, रेल्वेस्थानकाबाहेरील विक्रेत्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:04 PM2022-05-30T12:04:19+5:302022-05-30T12:04:26+5:30
अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन, ध्वनिप्रदूषणा पाठोपाठ आता फेरीवाल्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानकाबाहेर १५० मीटर, तर शाळेच्या १०० मीटर परिसरात असलेल्या फेरीवाल्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले. तसेच, अधिकृत फेरीवाल्यांबाबत योग्य नियोजन करत त्यांची जागा ठरवून देण्याबाबतही पालिकेसोबत पत्रव्यवहार करणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय, काही फेरीवाल्यांना पोलीस, पालिकेच्या कारवाईच्या भीतीने सुरू असलेल्या वसुलीचाही फटका बसत असल्याचे समोर येत आहे. बऱ्याच ठिकाणी गुंडाकडून परस्पर रस्त्यावरची जागा विकून त्याठिकाणी फेरीवाले बसत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आयुक्तांनी खंडणीविरोधी पथकाकडे दिली आहे, तर दुसरीकडे या विक्रेत्यांसाठी झोन ठरवून त्यांना ओळखपत्र देऊन कायदेशीररीत्या विक्रीसाठी परवानगी देणे गरजेचे आहे. अधिकृत विक्रेता समितीद्वारे यावर नियोजन राहू शकते, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.
शाळा, मंदिर याठिकाणी १०० मीटरच्या अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बंदी आहे, तर रेल्वे स्थानकाबाहेर दीडशे अंतरापर्यंत ते कशाचीही विक्री करू शकत नाहीत. लवकरच शाळाही सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने शाळा आणि रेल्वे स्थानकाबाहेर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत कारवाईचा वेग वाढणार आहे. तसेच सोसायटीतील रहिवाशांवर नियमबाह्य कारवाई करू नका, असे आवाहनही आयुक्तांनी को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील सदस्यांना केले आहे.
पोलिसांच्या तक्रारी सायंकाळी सहानंतर-
पोलीस बदलीला तूर्तास ब्रेक लागला असून, पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास सायंकाळी ६ नंतर आयुक्तांचे दालन त्यांच्यासाठी खुले असणार आहे. पोलिसांनी तक्रारीसाठी सायंकाळी ६ नंतर थेट भेट घेण्याबाबतही आयुक्तांनी फेसबुक पोस्टद्वारे आवाहन केले आहे. त्यानुसार त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.