Join us

"जनतेनं आपला मूड दाखवून दिलाय"; गडकरींनी सांगितलं राज'कारण', मानले मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 15:55 IST

भाजपाच्या या यशानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

मुंबई - लोकसभा निवडणुकांची रंगीत तालिम असलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांपैकी ४ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सुरुवातीला हाती आलेल्या निकालाच्या आकडेवारीवरुन आता ४ पैकी ३ राज्यात भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले असून काँग्रेसला १ राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश येत आहे. तेलंगणात काँग्रेसने के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा पराभव करत स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. तर, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात भाजपला स्पषट बहुमत मिळत असल्याचं दिसून येतं. भाजपाच्या या यशानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केल्यानंतर आता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. ''देशातील जनतेनं या निवडणुकांमधून आपला मूड दाखवून दिलाय. विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपला मोठं यश मिळालंय. मोदींच्या नेतृत्त्वात आमच्या सरकारने जी रणनिती ठरवली होती, त्यास जनतेनं एकप्रकारे समर्थन देत पाठिंबा केला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचं विशेष आभार मानतो, अभिनंदन करतो. तसेच, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो,'' अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीदिली आहे.  मला विश्वास आहे की, विकासाच्या यात्रेत प्रत्येक राज्यात डबल इंजिनचं सरकार आल्यास आणखी वेगाने विकास होईल, आणि जनतेला याचा परिणाम दिसून येईल. जनतेचा हा पाठिंबा देशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही गडकरी यांनी म्हटले. 

फडणवीसांनीही व्यक्त केला आनंद

दरम्यान, आजच्या निकालानंतर भाजपा नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत एमपीच्या मनात मोदीच असल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थोडक्यात प्रतिक्रिया दिली. ''मी आत्ता एवढंच सांगेन, मी आनंदी आहे, यावर मी सविस्तर बोलेन, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ४ राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. तसेच, विकास आणि विश्वास, देश केवल मोदीजी के साथ, अशीही प्रतिक्रिया फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

निवडणूक निकाल अपडेट पाहा -

https://cms.lokmat.com/node/803768

टॅग्स :निवडणूकभाजपानितीन गडकरीनरेंद्र मोदीराजस्थान विधानसभा निवडणूक