उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र नशा मुक्त करण्याचा जनतेचा एकजुटीने केला निर्धार
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 3, 2025 18:13 IST2025-01-03T18:13:18+5:302025-01-03T18:13:34+5:30
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील झूला मैदान, बांद्रा प्लॉट येथे काल सायंकाळी आयोजित नशा मुक्ती जनजागृत अभियानात येथील नागरिकांनी केला.

उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र नशा मुक्त करण्याचा जनतेचा एकजुटीने केला निर्धार
मुंबई :तरुणांमध्ये ड्रग सेवनाचे प्रमाण वाढले असल्याने देशाचे उज्ज्वल भवितव्य असलेली व नशेच्या आहारी गेल्याने तरुण पिढी बरबाद होत आहे. परिणामी त्यांचे कुटुंब उध्वस्त होत असून त्याचे समाजावर परिणाम होत आहे.यावर मात करण्याबरोबरच तरुणांना नशे पासून परावृत्त करण्यासाठी तसेच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र नशा मुक्त करण्याची शपथ घेऊन एकजुटीने निर्धार करण्यात आला.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील झूला मैदान, बांद्रा प्लॉट येथे काल सायंकाळी आयोजित नशा मुक्ती जनजागृत अभियानात येथील नागरिकांनी केला. या लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून व स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून या अभियांनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला डीजीटीएसचे अतिरिक्त संचालक समीर वानखडे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त संपतराव पाटील, मेघवाडी पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव, नशाबंदी मंडळ- महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, मनीषा वायकर, महिला विभाग प्रमुख प्रियंका अंबोलकर, शाखाप्रमुख हुसेन करोडी ,महिला शाखा प्रमुख वेरोंनीका, मिलिंद कापडी, डॉ. आरीफ आदि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार रविंद्र वायकर यांनी सांगितले की, आजचे नशा मुक्ती अभियान हे समाज सुधारण्याचा इशारा आहे. समाजात परिवर्तन करण्यासाठी आवश्यकता भासल्यास या प्रश्नी जशास तसे उत्तर देण्यात येईल. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेला घरात व समाजात शांती हवी आहे. त्यामुळे ड्रग विकणाऱ्यानी आजच्या या अभियानाचा बोध घ्यावा, नाही तर या नंतर ड्रग विकताना आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी समीर वानखेडे म्हणाले की, ड्रग विकणे व बाळगणे हा किती गंभीर गुन्हा आहे. यामुळे किती वर्षांची शिक्षा होऊ शकते तसेच ड्रग घेणाऱ्या व्यतीची लक्षणे, ड्रगचे किती प्रकार आहेत, याची माहिती उपस्थित जनतेला दिली. यावर सर्वानी मिळून मात न केल्यास आगामी 10 वर्षांत ड्रग घराघरात शिरल्या शिवाय राहणार नाही, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. ड्रग विक्रीतून जांम होणारे पैसे हवालाच्या माध्यमातून अतिरेकी हल्ला करणाऱ्या देशांमध्ये पाठवण्यात येतो. मग हेच देश या पैशातून आपल्या देशावर अतिरेकी हल्ला करतात, अशी माहीत ही त्यांनी यावेळी दिली.
परीमंडळ 10 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, यावर्षी ड्रगची विक्री करणाऱ्या 76 जणांवर कारवाई करण्यात आली असून नशा मुक्तीसाठी शाळा व कॉलेजमध्ये पोलिस दलातर्फे जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. ड्रगचे सेवन करण्याऱ्या व्यक्तिच्या शरीरिक, वैचारिक व मानसिक होणारी हानी, त्यामुळे कुटुंबावर तसेच समाजावर होणारे परिणाम याची माहिती त्यांनी दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त संपतराव पाटील, मेघवाडी पोलिस पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी देखील मार्गदर्शन केले. तर नशा मुक्ती संघटनेच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी, ड्रगच्या आहारी गेलेल्या व्यक्तीची त्यापासून सुटका करण्यासाठी संघटनेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.