Join us  

प्रत्येक शिफ्टचा पर्सेंटाइल वेगवेगळा; गुणातील तफावतीवर सीईटी सेलचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 6:13 AM

प्रत्यक्ष गुणांमध्ये आणि पर्सेंटाइलमध्ये तफावत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी पुन्हा एकदा सीईटी - सेलच्या कार्यालयात गर्दी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एमएचटी - सीईटीचे पर्सेंटाइल शिफ्टनिहाय ठरविले जात असल्याने गुणांमध्ये आणि पर्सेंटाइलमध्ये तफावत असल्याचा खुलासा राज्याच्या सीईटी - सेलकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक शिफ्टचा पर्सेंटाइल किती, हे कळायला काहीच मार्ग नसल्याने निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम वाढत चालला आहे.

प्रत्यक्ष गुणांमध्ये आणि पर्सेंटाइलमध्ये तफावत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी पुन्हा एकदा सीईटी - सेलच्या कार्यालयात गर्दी केली होती. काही विद्यार्थ्यांकडे पुराव्यादाखल आन्सर कीचे स्क्रिन शॉट होते.  मात्र, सीईटी - सेलने तीन दिवसांनंतर आन्सर की काढल्याने अनेकांकडे आपली बाजू पटवून देण्याकरिता काहीच पुरावा नव्हता. शंका असलेल्या विद्यार्थ्यांना येथील कर्मचारी कॉम्प्युटरवर तपासणी करून केवळ पर्सेंटाइल सांगत होते. मात्र, आपल्या गुणांशी ते पडताळून पाहण्याचा कोणताच मार्ग  काही विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना हात हलवत परत जावे लागले.

सीईटी-सेलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह 

- विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडण्यात पुढाकार घेणाऱ्या युवासेनेनेही सीईटी - सेलच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत एमएचटी - सीईटीच्या निकालात पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे. 

-  विद्यार्थ्यांनी यासंदर्भात युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन युवासेनेचे नेते आणि माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची भेट घेतली. 

- निकालाबाबत त्यांनी दिलेल्या माहितीवर समाधान झालेले नाही, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. यासंबंधी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांची भेट घेऊन परीक्षेतील त्रुटी दाखवून देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

विद्यार्थी, पालक उशिरापर्यंत सीईटी कार्यालयातज्यांच्याकडे पुराव्यादाखल स्क्रीन शॉट होते, त्यांनाही तुम्ही ज्या शीफ्टमध्ये परीक्षा दिली तिचा पर्सेंटाइल जास्त असल्याने तुमचा पर्सेंटाइल खाली आला असावा, असे कारण देण्यात येत होते. मात्र, विद्यार्थ्यांकडे शिफ्टचा पर्सेंटाइल पडताळून पाहण्याची कोणतीच सोय नाही. हतबल झालेले विद्यार्थी - पालक सायंकाळी उशिरापर्यंत सीईटी - सेलच्या कार्यालयात बसून होते. परंतु, त्यांच्या शंकांचे समाधान शेवटपर्यंत झालेच नाही.

एमएचटी - सीईटी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे अनेक बॅचमध्ये घेण्यात येते. प्रत्येक प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक बॅचचा वेगळा पर्सेंटाइल गृहीत धरला जातो. यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा समपातळीवर होत नाही. या पद्धतीवर आमचा आक्षेप असून, एकाच प्रश्नपत्रिकेसह, एकाच वेळी परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावे. तसेच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, शिफ्टचा पर्सेंटाइलही त्यांच्या गुणपत्रिकेत दाखवण्यात यावा.- प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य

टॅग्स :परीक्षाशिक्षण