"घरात घुसून मारु"; धमकी मिळताच टीसीला मारहाण करणाऱ्याने मागितली जाहीर माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 05:41 PM2024-08-20T17:41:24+5:302024-08-20T17:43:53+5:30
पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आता शीख समुदयाची माफी मागितली आहे.
Mumbai Local : दोन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलमध्ये तिकीट तपासनीसला प्रवाशाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आरोपीने टीसीचा शर्ट फाडून त्याला धक्काबुक्की केली. या सगळ्या वादात टीसीकडील दंडाचे दीड हजार रुपयेही गहाळ झाले होते. त्यानंतर मारहाण करणाऱ्या प्रवाशाने माफीनामा लिहून आणि टीसीला हरवलेले पैसे परत करून प्रकरण मिटवले. मात्र, बोरिवली रेल्वे पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे, आता आरोपी प्रवाशाला मारण्याच्या धमक्या येत असल्याचे समोर आलं आहे. या संदर्भातील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलमध्ये टीसीला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आरोपी प्रवाशाने माफी मागून हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. त्यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे या मारहाणीमध्ये टीसीच्या दाढीला हात लावल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत एका सोशल मिडिया एन्फ्लुएन्सने आरोपीला घरात घुसून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आता या प्रकरणात ट्वीस्ट आला आहे. आरोपीने धमकी देणाऱ्याची भेट घेऊन जाहीर माफी मागितली आहे.
अनिकेत भोसले असे टीसीला मारहाण करणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे. तर जसबीर सिंग असे मारहाण झालेल्या टीसीचे नाव आहे. अनिकेत भोसले त्यांच्या साथीदारांसह फर्स्ट क्लासच्या तिकीटावर चर्चगेट ते विरार लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी टीसी जसबीर सिंग यांनी अनिकेत भोसले यांच्याकडे तिकीट नसल्याने दंड भरण्यास सांगितला. मात्र यावरुन टीसी आणि अनिकेत भोसले यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये जसबीर सिंग यांचा शर्ट फाटला आणि त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं. त्यानंतर नालासोपारा येथे उतरून माफीनाम्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आलं. मात्र आता भोसले यांना विकी थॉमस सिंग नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावरुन धमकी दिली होती.
"रेल्वे पोलिसांना विनंती आहे सदर टीसी हा सरकारी नोकरी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत होता. त्याच्या गळ्यामध्ये ओळपत्रही होतं. असं असताना गुंडगिरी होत असेल तर मी गुंडांचा गॉडफादर आहे. मारहाण करणाऱ्याच्या घरात घुसून मी मारेन. आम्हाला बोट दाखवू नका, नाहीतर बोट देखील राहणार नाही. केवळ एफआयआरवर भागणार नाही. पुढील कारवाई थेट कोर्टात होईल. कायदा अस्तित्वात आहेच," असं विकी थॉमस सिंगने म्हटलं.
त्यानंतर अनिकेत भोसले त्यांच्या कुटुंबासह मुलुंडमधील गुरुद्वाराला भेट दिली जिथे त्यांनी विकी थॉमस सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भोसले यांनी त्यांच्या कृत्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली. त्यानंतर त्यांनी शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथसाहिबसमोर प्रार्थना केली आणि त्यांच्या हिंसक कृत्याबद्दल खेद व्यक्त केला.