मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष पाचने दोनजणांना शनिवारी भांडुप येथून अटक केली. यातील मुख्य सूत्रधार अशोक खरात (वय ५६) हा मकोकातील आरोपी असून, तो ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या पथकाने भांडुपच्या कोकणनगर येथून खरात आणि त्याचा साथीदार किशन सोळंकी (३५) याला शनिवारी अटक केली. खरात हा महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल सेना उपाध्यक्ष असून, त्यांचे चेंबूरमध्ये कार्यालय आहे. खरातने काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. खरात याच्यावर डोंबिवली पोलिस ठाण्यात खून, रबाळे पोलिसांत खंडणी, मकोका तसेच भांडुप पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगल यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांच्या ८ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.
तीन मोबाइल जप्तआराेपींकडून तीन मोबाइल हस्तगत करण्यात आले असून, हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाकडे वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.