Join us  

'ज्यांना जायचंय त्यांनी जा...'; उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आणखी ६ आमदार नॉट रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 8:07 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधावारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

मुंबई : 'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा...'असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बुधवारी रात्री 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे जाताना उद्धव ठाकरे असं बोलले आणि निघून गेले. उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे  शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. 

'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा...' या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर  शिवसेनेतील आणखी ६ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड, दादरमधील आमदार सदा सरवणकर, कुर्ला विभागातील आमदार मंगेश कुडाळकर आणि चांदिवली विभागाचे आमदार दिलीप लांडे हे नॉट रिचेबल असून सूरतमार्गे गुवाहटीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधावारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे.

दरम्यान, ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

गटनेता आणि प्रतोद नियुक्ती

३१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. एकनाथ शिंदे हेच पक्षाचे गटनेते असतील, असा ठराव संमत करण्यात आला. त्यासोबतच, पक्षाचे विधिमंडळ प्रतोद म्हणून आ. भरत गोगावले यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांना तत्काळ प्रभावाने प्रतोद पदावरून हटविण्यात येत असल्याचेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार