मुंबई: मुंबईहून भूजला जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेताच इंजिन कव्हर धावपट्टीवर तुटून पडल्याने आणीबाणीजन्य परिस्थिती उद्भवली. याबाबतची माहिती मिळताच मुंबईतील विमान वाहतूक नियंत्रण कक्षाद्वारे (एटीसी) वैमानिकांना सूचित करण्यात आले. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेत भूज विमानतळावर या विमानाचे सुरक्षित लॅण्डिंग करण्यात आले.अलायन्स एअरचे एटीआर ७२ - ६०० (व्हीटी आरकेजे) हे विमान मुंबई-भूज मार्गावर नियोजित होते. चार केबीन क्रू आणि विमान देखभाल अभियंत्यासह ७० जण त्यातून प्रवास करीत होते. मुंबई विमानतळावरून उड्डाण घेत असताना या विमानाचे इंजिन कव्हर धावपट्टीवर तुटून पडले. त्यामुळे ते इंजिन कव्हरविना आकाशात झेपावले. इंजिन उघडे असल्याने आग लागण्याचा किंवा वाऱ्याच्या वेगामुळे त्यात बिघाड होण्याचा धोका होता. विमान वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.विमानाने उड्डाण घेतल्यानंतर धावपट्टीवर काही पडल्याचे निदर्शनास येताच तेथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी धावपट्टीची पाहणी केली. त्यावेळी उपरोक्त विमानाच्या इंजिनाचे कव्हर निखळून पडल्याचे समोर आले. मुंबईतील विमान वाहतूक नियंत्रण कक्षाने याबाबत तत्काळ वैमानिकांना सूचना दिली. त्यामुळे त्यांनी सर्व संभाव्य धोके लक्षात घेऊन विमानाचे प्रचालन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भूज विमानतळावर सर्वतोपरी काळजी घेत या विमानाचे सुरक्षित लॅण्डिंग करण्यात आले.
दुरुस्ती कामात हलगर्जी? इंजिन कव्हर निखळून पडणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्याची उघड-झाप करण्यासाठी कडी लावलेली असते. दुरुस्ती कामे करताना तिची सुस्थिती तपासावी लागते; परंतु त्यात कसूर करण्यात आल्याने हा प्रकार घडला असावा, असे मत हवाई वाहतूकतज्ज्ञ कॅ. अमित सिंह यांनी व्यक्त केले.
डीजीसीए करणार तपासविमान वाहतूक महासंचालनालयाने तपास सुरू केला आहे. या प्रकारास जबाबदार कोण, इंजिन कव्हर निखळून पडण्याइतपत सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले काय, विमानाची दुरुस्तीकामे वेळेवर होत नव्हती काय, या दिशेने तपास केला जाणार आहे.