धावपट्टीला स्पर्श करताच विमान घसरले
By मनोज गडनीस | Published: September 15, 2023 01:06 PM2023-09-15T13:06:31+5:302023-09-15T13:07:38+5:30
Mumbai Airport Accident: मुसळधार पावसात मुंबई विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले एक छोटे विमान (चार्टर्ड) गुरुवारी सांयकाळी पाच वाजून दाेन मिनिटांनी घसरले.
- मनाेज गडनीस
मुंबई - मुसळधार पावसात मुंबईविमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले एक छोटे विमान (चार्टर्ड) गुरुवारी सांयकाळी पाच वाजून दाेन मिनिटांनी घसरले. धावपट्टीवरून घसरून हे विमान बाजूच्या गवतात जाऊन आदळले. हा आघात इतका जबरदस्त होता की विमान आदळल्यावर त्याचे दोन तुकडे झाले. यावेळी विमानात २ कर्मचारी व ६ प्रवासी होते. यापैकी तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांना अंधेरीच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक असली तरी त्यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. व्हीएसआर व्हेंचर कंपनीचे लिअरजेट ४५ (व्हीटी-डीबीएल) या विमानाने सहा प्रवाशांना घेऊन विशाखापट्टणम येथून उड्डाण केले. सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईत ते उतरण्याच्या तयारीत होते. त्यावेळी विमानतळावर मुसळधार पाऊस सुरू होता.
विमानतळावरची दृष्यमानता ७०० मीटर इतकी होती. एअर ट्राफिक कन्ट्रोलने विमानाला रन-वे क्रमांक २७ वर उतरण्याची अनुमती दिली. ही अनुमती मिळाल्यानंतर विमान उतरण्यासाठी खाली उतरू लागले.
विमानाने धावपट्टीला स्पर्श करताच विमान घसरले आणि धावपट्टीच्या बाजूला असलेल्या गवतात जाऊन आदळले.
विमानाच्या पुढील बाजूचे दोन तुकडे झाले. ही घटना पाहून एटीसीमधील अधिकाऱ्यांना क्रॅश क्रॅश असा जोरदार इशारा दिला.
त्यानंतर तातडीने विमानतळावर तैनात अग्निशमन दलाच्या गाड्या व ॲम्बुलन्स विमानाच्या दिशेने रवाना झाल्या व त्यांनी त्यातील २ विमान कर्मचारी व सहा प्रवाशांना बाहेर काढले.