मुंबई : उन्हाळा वाढू लागताच रस्त्याच्या बाजूला गॉगलची दुकानेही वाढू लागली आहेत. १०० ते १५० रुपयांत त्याची विक्री केली जाते. परंतु, या स्वस्तातल्या आणि निकृष्ट दर्जाच्या गॉगल्समुळे डोळ्यांवर गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात, असा इशारा नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे गॉगल वापरण्यापूर्वी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. तसेच शक्यतो नामांकित कंपन्यांचेच गॉगल वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुठलाही चष्मा घेताना ही घ्या काळजी
केवळ रस्त्यावरचेच नव्हे, तर दुकानातील गॉगल घेतानाही काळजी घेण्याची गरज असते. गॉगल समोर धरल्यास पलीकडील दृश्य स्पष्ट दिसायला हवी. जर ते दृश्य अस्पष्ट आणि चित्र-विचित्र दिसत असेल तर तो गॉगल निकृष्ट दर्जाचा समजावा. नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट गॉगल विक्रीचे पेव फुटले आहे. या स्वस्तातील गॉगलमुळे डोळेदुखी, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला का?
कमी किमतीच्या गॉगलसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व त्यावरचा रंगही निकृष्ट दर्जाचा असतो. सुमार दर्जाच्या या गॉगलमध्ये अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून संरक्षण देणारी सुविधा नसते. त्यामुळे डोळ्यांच्या बुबुळांना इजा होऊ शकते. यापासून बचावासाठी गॉगल घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
रस्त्याच्या कडेला १००-२०० रुपयांत मिळणारे गॉगल्स दीर्घकाळ वापरल्यास डोळ्यांवर परिणाम होऊ शकतात. ते फोटोपुरतेच ठीक. दुचाकीवर किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात वापरण्यासाठी स्वस्तातला गॉगल घ्यायचा असल्यास तो विनारंगाचा, पारदर्शी घ्यावा. - डॉ. संदेश पाटील, आरोग्यतज्ज्ञ
तापमान ३८ अंशांवर
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मंगळवारी तापमान ३८.२ अंश नोंदविण्यात आले. कडाक्याच्या उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होण्यासह इतर समस्या उद्भवत आहेत.