बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 11:53 AM2023-08-06T11:53:15+5:302023-08-06T11:53:22+5:30
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यापासून प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन मंडळाच्या १५० गाड्या विविध मार्गांवर चालविण्यात आल्या. इतकेच नव्हेतर, भाडेतत्त्वावरील बेस्टच्या ४८८ बसही विविध मार्गांवर चालविण्यात आल्या. मात्र, या बस मुंबईकरांसाठी अपुऱ्या पडत होत्या. बेस्टमधून दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात; परंतु, या अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे शनिवारीदेखील हाल झाले.
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यापासून प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केल्याने विविध आगारांत कंत्राटी कर्मचारीच नाहीत. त्यामुळे बेस्टच्या चालकांना विविध आगारांत ड्युटी लावण्यात आली.
पगारवाढ व इतर प्रमुख मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी गेल्या तीन दिवसांपासून संप पुकारला असून, या संपामुळे बऱ्याच बस आगारात उभ्या आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वी बेस्टच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झालेले विजय सिंघल हे नुकतेच परदेश दौऱ्यावर गेले होते. मात्र, बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी या दौऱ्याची पुरती वाट लावली. मुंबईकरांची होणारी गैरसोय पाहता सरकारने त्यांना तत्काळ मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे सिंघल यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. ते शनिवारी सकाळीच मुंबईत परतले.
बेस्ट प्रशासनाने हस्तक्षेप करावा
कंत्राटी कामगारांच्या या संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने कुलाबा बेस्ट भवन येथे कर्मचाऱ्यांची भेट घेतली. इतकेच नव्हे तर कामगारांच्या समस्या मांडल्या त्यावर लवकर निर्णय घेऊ असे बेस्ट प्रशासनाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाला सांगण्यात आले अशी माहिती उपाध्यक्ष केतन नाईक यांनी दिली.
बेस्टच्या संपामुळे रिक्षा, टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. कामावर जाताना जास्तीचे पैसे प्रवासासाठी मोजावे लागत आहेत. हा संप आणखी किती दिवस सुरू राहणार जेणेकरून आम्हाला बेस्टच्या बस मधून परवडणाऱ्या दरात प्रवास करता येईल.
- संतोष देसाई, मालाड (बेस्ट प्रवासी)
बेस्टच्या अधिकाऱ्यांना काही देणे-घेणे नाही
संबंधित कंत्राटदाराला अटी नियमांचे उल्लंघन केल्याने एका दिवसाला एका बस मागे ५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे आतापर्यंत किती बसेस रस्त्यावर उतरल्या नाहीत या बस गाड्यांमागे किती दंड आकाराला याबाबत बेस्टच्या जनसंपर्क विभागाला विचारणा केली असता योग्य ती माहिती देण्यात आली नाही.