मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचा खर्च भागविण्यासाठी आता विधानभवन मेट्रो स्थानकाच्या जवळील राजकीय पक्षांची आणि सरकारी कार्यालये असलेल्या जागेचा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) व्यावसायिक विकास केला जाणार आहे. त्यासाठी नाईट फ्रँक संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यातून सुमारे १ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा एमएमआरसीचा मानस आहे.
राज्य सरकारने मेट्रो ३ मार्गिकेच्या विधानभवन स्थानकाजवळची १.६८ हेक्टर जागा स्थानकाच्या उभारणीच्या कामासाठी एमएमआरसीकडे हस्तांतरित केली होती. या जागेवर राजकीय पक्ष आणि सरकारी कार्यालये होती. मात्र, मेट्रोच्या कामासाठी ही जागा आवश्यक असल्याने भूखंडावरील राजकीय पक्षांची कार्यालये स्थलांतरित करण्यात आली होती. सरकारने मेट्रो स्थानकाच्या उभारणीनंतर या ठिकाणी १.१३ लाख चौरस फुटाचे बांधकाम करून या कार्यालयांचे पुनर्वसन करण्याचे बंधन एमएमआरसीवर घातले होते.
राज्य सरकारने मेट्रो ३ मार्गिकेसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी आरे कारशेडजवळील ३ हेक्टर जागा एमएमआरसीएलला दिली होती.
अधिकाधिक उत्पन्नासाठी प्रयत्न-
१) दरम्यान, एमएमआरसीने या भूखंडाचा विकास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार आता या भूखंडासाठी नाईट फ्रँक या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
२) या भूखंडाचा कशापद्धतीने विकास साधून अधिकाधिक उत्पन्न मिळू शकेल याची पडताळणी सल्लागाराकडून केली जाणार आहे, अशी माहिती एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
३) सल्लागाराचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमएमआरसीकडून भूखंडाच्या विकासाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान नया नगर, धारावी आणि मरोळ या भागातही मेट्रो स्थानकांच्या कामानंतर काही भूखंड शिल्लक राहिला आहे.
४) या भूखंडांचाही व्यावसायिक विकास करण्याचा एमएमआरसीचा विचार आहे. यासाठीही एमएमआरसी सल्लागाराची नियुक्ती करत आहे.