बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 08:40 AM2024-10-24T08:40:26+5:302024-10-24T08:40:44+5:30
या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने हरयाणातून अमित हिरामसिंग कुमार (२९) याला अटक केली आहे. पुण्यातूनही आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे. रूपेश मोहोळ (२२), करण साळवे (१९) आणि शिवम कोहाड (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहम्मद झिशान अख्तर हा आरोपी जूनमध्ये हरयाणाच्या कैथल कारागृहातून बाहेर पडताच त्याच्या वास्तव्यापासून सर्व व्यवस्था अमितने केल्याचे तपासात उघड झाले आहे.
कैथलमध्येच सिद्दीकी यांच्या हत्येचा कट शिजल्यानंतर अख्तर याने शुभम लोणकर याला पैसे पाठविल्याचेही आरोपीच्या चौकशीत समोर आले आहे. अमित दारूचा ठेका चालवत होता. अख्तर कारागृहातून बाहेर पडला. कैथलला गेला. येथे अमितने त्याच्या वास्तव्यापासून सर्व व्यवस्था केली. फिरताना अमित हा अख्तरसोबत होता. सुमारे अडीच लाख अमितच्या खात्यात आले. त्याने आठवेळा पैसे काढून अख्तरला दिले. पुढे अख्तरने हे पैसे शुभम लोणकरला पाठवले. शुभमने हे पैसे शूटर्सला पुरवल्याचे चौकशीतून समोर आले.