मीरारोड: शहीद उद्यानातील बेकायदा फटाके विक्रीचा स्टॉल हटवला
By धीरज परब | Published: October 20, 2022 10:26 PM2022-10-20T22:26:06+5:302022-10-20T22:57:00+5:30
'लोकमत ऑनलाइन'च्या बातमीनंतर तात्काळ कारवाई
मीरारोड:
येथील शीतल नगर येथील गृहसंकुलाच्या आरजी जागेतील शहिद उद्यानात उभारलेल्या फटाका स्टॉल विरोधात शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई - वडिलांनी अन्य रहिवाश्यांसह विरोध करत धरणे धरल्याचे वृत्त सर्वात आधी लोकमत ऑनलाईन ने देताच पोलीस आणि पालिकेने काही वेळातच घटनास्थळी जाऊन तो वादग्रस्त बेकायदा फटाका स्टॉल हटवण्यात आला.
मीरारोडच्या शीतल नगर मध्ये तर शहिद उद्यानात फटाका स्टॉल उभारण्यात आल्याने स्थानिक रहिवासी संतप्त झाले. गृहसंकुलाच्या आरजी ची जागा असताना रहिवाश्याना न जुमानता महापालिकेने तेथे फटाका स्टॉल ना परवानगी दिली व विक्रेत्याने बळजबरी उद्यानात जाऊन स्टॉल उभारला असा आरोप रहिवाश्यांसह आम आदमी पार्टी ने केला. वास्तविक रहिवाश्यांच्या हक्काचा आरजी भूखंड असताना कोणी सोम्या गोम्या उठतो आणि आपली जमीन सांगून फटाका स्टॉल ना नाहरकत देत असेल तर ते खपवून घेणार नाही असा इशारा रहिवाश्यासह सजी आयपी, सुखदेव बिनबंसी, प्रमोद भाटकर आदींनी दिला.
दरम्यान, स्थानिक रहिवाशी असलेले शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाश यांनी देखील शहिद उद्यानात फटाका स्टॉल ला विरोध करत रहिवाश्यांसह उद्यानाच्या बाहेर धरणे धरले . पालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दुपारी घटना स्थळी जाऊन त्यांची समजूत काढली. तसेच लोकमतशी बोलताना आपण स्टॉल हटवण्याचे निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले. मात्र सायंकाळ पर्यंत स्टॉल तसाच असल्याने लोकमत ऑनलाईन वर शहिद मेजर यांच्या आई - वडिलांनी धरणे धरल्याचे वृत्त प्रकाशित होताच पोलीस आयुक्त सदानंद दाते व पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी तात्काळ कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काही वेळातच पालिका आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तो बेकायदा फटाका स्टॉल काढायला लावला . वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रमेश भामे सह अन्य पालिका अधिकाऱ्यांनी शहिद मेजर राणे यांच्या आईंना फळाचा रस देऊन धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.