परिमंडळ दोनच्या पोलिसांनी चोरी झालेला ३३ लाखांचा मुद्देमाल ६१ नागरिकांना केला परत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 08:05 PM2023-06-23T20:05:01+5:302023-06-23T20:05:20+5:30
यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, विनायक नरळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे.
नालासोपारा - परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांनी चोरी झालेला ३३ लाख ४२ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल ६१ नागरिकांना शुक्रवारी संध्याकाळी आचोळे रोडवरील रिजन्सी हॉटेलच्या हॉलमधील मुद्देमाल हस्तांतर कार्यक्रमात परत करण्यात आला आहे. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, विनायक नरळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ २ मधील वालीव, आचोळे, तुळींज, माणिकपूर, वसई आणि नायगांव या सहा पोलीस ठाण्यांनी १६ जणांचे सोन्याचांदीचे दागिने, १३ मोबाईल, ३० वाहने, १ लॅपटॉप, लाखोंचे चोरी झालेले ऑईल असा एकूण ३३ लाख ४२ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल ६१ नागरिकांना परत केला. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक तक्रारदारांनी त्यांचा चोरीला गेलेला माल परत मिळेल की नाही, ही आशा सोडली होती. मात्र पोलिसांच्या तपासामुळे आणि समजुतीमुळे हे काम शक्य झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
गुजरातवरून चोरी केलेली चांदी, दिल्लीवरून लाखोंचा घरफोडीचा मुद्देमाल परत केल्याचे पोलिसांनी सांगितले. परिमंडळ दोन मधील वालीव २०, आचोळे ९, तुळींज १४, माणिकपूर १०, वसई ४ आणि नायगाव ६ असे एकूण ६१ गुन्ह्यांतील मुद्देमाल परत केला आहे.