पोलिसांनी केला आवाजच बंद...; कर्कश १० हजार सायलेन्सर, हॉर्नवर वाहतूक पोलिसांनी फिरवला रोलर
By मनीषा म्हात्रे | Published: June 28, 2024 08:00 PM2024-06-28T20:00:47+5:302024-06-28T20:01:26+5:30
महिनाभरात ११ हजार ६३६ वाहनांवर कारवाई, वाहतूक पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण लक्षात घेता, मुंबई वाहतूक पोलिसांनीही कठोर पावले उचलत कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई सुरु केली आहे. गेला महिनाभरात विशेष मोहीम राबवून तब्बल ११ हजार ६३६ वाहनांवर कारवाई करत १० हजार २७३ सायलेन्सर, हॉर्न जप्त केले. शुक्रवारी वरळी पोलीस मैदानात या जप्त केलेल्या सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून ते एकाच वेळी नष्ट करण्यात आले आहे. आतापर्यतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. चालक दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषणात भर पडत आहे. याचे गाम्भीर्य लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई वाहतूक विभागाने दिनांक २१ मे ते ११ जून दरम्यान विशेष मोहीम राबवून ११,६३६ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत बदल केलेले २००५ सायलेन्सर व कर्णकर्कश आवाज करणारे एकुण ८,२६८ प्रेशर हॉर्न जप्त केले. तसेच, संबंधितांवर ३३ लाख ३१ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई ही करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी वरळी पोलीस मैदानावावर जप्त केलेले सायलेन्सर आणि हॉर्न पोलिसांनी नष्ट केले आहे.
यादरम्यान वाहतूक विभागाचे वरिष्ष्ठ, प्रभारी पोलीस निरीक्षक तसेच उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदाराना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तर निर्माते आणि विक्रेत्यांवरही कारवाई
मुंबई वाहतूक विभागामार्फत ही मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. मोटर वाहन उत्पादक कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या मोटर सायकल सायलेन्सरमध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध बदल करण्यात येऊ नये, त्याचप्रमाणे कायद्याने विहित केल्याप्रमाणे वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण तपासणी करावी.
यापुढे, असे बदल करून देणाऱ्या सायलेन्सर व प्रेशर हॉर्न निर्माते, वितरक आणि विक्रेते यांच्यावरही मुंबई वाहतूक विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- अनिल कुंभारे, सह पोलीस आयुक्त, वाहतूक