मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले खरे पण त्यानंतर काही तासांतच चक्रे फिरली व तुम्ही येऊ नका, आम्हीच तुमच्या सागर बंगल्यावर येतो, असा निरोप फडणवीस यांना आला.
पोलिसांनी नोटीस पाठवून जबाबासाठी बोलविल्याची माहिती स्वत: फडणवीस यांनीच शनिवारी दिली. त्यानंतर सायंकाळी फडणवीस यांनीच सहपोलीस आयुक्तांनी दूरध्वनी करून तुम्ही पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून माहिती घेऊ., अशी माहिती ट्विटरवरून दिली.
निर्णय का बदलला?
मुंबई पोलिसांनी अशी भूमिका का बदलली, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. फडणवीस पोलीस ठाण्यात पोहोचले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा पोलिसांचा अंदाज असू शकताे. विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. फडणवीस यांना ठाण्यात बोलविले तर तीव्र पडसाद अधिवेशनात उमटू शकतील याचा अंदाज घेऊन महाविकास आघाडी सरकारने राजकीय संघर्ष टाळला, असेही म्हटले जात आहे.
षड् यंत्राचा पर्दाफाश केल्याने नोटीस पाठविली असावी
मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता आहे आणि पोलीस माझ्याकडील माहितीचा स्रोत विचारू शकत नाहीत. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. योग्य उत्तर देणार आहे. मी सरकारच्या आशीर्वादाने विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध झालेल्या षड्यंत्राचा अलिकडे पर्दाफाश केल्याने ही नोटीस पाठविली असावी. फोन टॅपिंग प्रकरणी मी माहिती फोडली नव्हती, सध्याच्या एका मंत्र्यांनीच ती फोडली होती आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते