संजय घावरेमुंबई :
शनिवार आणि रविवार हे दोन दिवस कोणत्याही नाटकासाठी संजीवनी देणारे असले तरी बालनाट्यांच्या वाट्याला हे दिवस क्वचितच येतात. त्यामुळे नाट्यगृहांच्या तारखांचे राजकारण जणू बालनाट्यांच्या मुळावरच उठल्याचा सूर बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींकडून आळवला जात आहे.
आज जवळपास नाट्यगृहांच्या तीन महिन्यांच्या तारखा बुक असून, जूनपर्यंत सर्व रविवारचे बुकींग फुल झाल्याचे चिल्ड्रन थिएटर्सचे संचालक राजू तुलालवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तुलालवार म्हणाले की, बालकलाकार ज्यात काम करतात अशा बालनाटकांना विविध स्पर्धा व आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशोक पावसकर यांची प्रेरणा थिएटर्स, प्रवीणकुमार भारदे यांची माता अनुसया, मंदार टिल्लू यांची गंधार या संस्थांनी चळवळीतील बालनाट्य टिकवून ठेवले आहे. चळवळ म्हणून बालनाट्य करणाऱ्या संस्थांना रविवारी दुपारचा प्रयोग मिळत नसल्याची सर्वांची खंत आहे.
महापालिकेच्या सवलती घेऊन बालनाट्ये सादर न करता पूर्ण भाडे भरायला तयार असूनही शनिवार-रविवारी बालनाट्यांना नाट्यगृहे मिळत नाहीत. इतर दिवस आणि सकाळचे शो दिले जातात. आज कोणीही पालक सुट्टी घेऊन मुलांना नाटक दाखवण्याच्या मन:स्थितीत नसल्याचा विचार करायला हवा. बालनाट्यांना रविवार दुपारचे प्रयोग देऊ नयेत असा कुठेही नियम नसतानाही सावत्र वागणूक मिळत आहे. दोन वर्षांनी पुन्हा बालनाट्ये सुरू झाली आहेत. सरकारने नाट्यगृहे खुली केल्यावर बालनाट्ये सादर करणाऱ्या संस्थांनी जेव्हा अर्ज द्यायला सुरुवात केली, तेव्हा तारखांचे वाटप अगोदरच झालेले होते.
नाट्यगृह व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाचीसाधारण एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांच्या तारखांच्या वाटपासाठी प्रत्येक नाट्यगृह १० जानेवारीपर्यंत अर्ज मागवते. याचे वाटप फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस केले जाते. या वर्षी निर्बंधांमुळे बालनाट्यांसाठी नाट्यगृहे खुली नव्हती. त्यामुळे इतर व्यावसायिक नाटकांना तारखांचे वाटप करण्यात आले. आता बालनाट्यांना रविवारच्या तारखा कशा मिळणार हा मुद्दा आहे. या परिस्थितीत नाट्यगृहांच्या व्यवस्थापनाने विचार केला, तर मोठ्यांच्या नाटकांच्या तारखा बालनाट्यांना दिल्या जाऊ शकतात. नाट्यगृहांकडे तसा अधिकार असतो. बालनाट्य जगवायचे असेल तर नाट्यगृहांनीही त्याचा वापर केला पाहिजे असे मत प्रेरणा थिएटर्सच्या चित्रा पावसकर यांनी व्यक्त केले.