Join us

देशात धर्माच्या नावाने गुलाम बनवण्याचे राजकारण, हे मोडून काढण्याची गरज-उद्धव ठाकरे

By धीरज परब | Published: February 09, 2023 8:58 PM

'आपण वंदे मातरम म्हणतो पण ह्या मातेला गुलाम बनवू पाहणाऱ्यां पासून दूर रहा.'

मीरारोड - धर्माच्या नावाने देशाला गुलाम बनवण्याचे राजकारण काही राजकारण्यांनी चालवले आहे. धर्माच्या नावाने दिशाभूल करून लोकांना आपल्या ताब्यात ठेवायचे प्रकार सुरु आहेत. त्याचा निषेध करण्याची व असले राजकारण मोडून काढण्याची गरज आहे. आपण वंदे मातरम म्हणतो पण ह्या मातेला गुलाम बनवू पाहणाऱ्यां पासून दूर रहा, सावध राहा अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता केली. 

भाईंदर पश्चिमेस विकासक प्रकाश जैन यांनी  उभारलेल्या वालचंद हाईट्स संकुलातील नव्याने बांधलेल्या भगवान विमलनाथ जैन मंदिराचे जीर्णोद्धार व अंजन शलाका प्रतिष्ठा महोत्सव साठी उद्धव हे आले होते. यावेळी जैन मुनी आचार्य भगवंत यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले . जैन मुनी यांनी प्रवचनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला. १४ एप्रिल १९९१ रोजी दादर येथे लब्दी सुरी जैन ज्ञान मंदिर येथे बाळासाहेब यांनी स्वतःहुन जैन महाराजांच्या  तेज व ज्ञानाला प्रभावित होऊन जीवनात काहीतरी त्याग करायचा म्हणून त्यांनी  मासांहारचा त्याग केला होता याची आठवण करून दिली. 

उद्धव यावेळी जैन मुनींच्या प्रवचनातील बाळासाहेबांचा संदर्भ घेत म्हणाले कि , देशात आजही बाळासाहेबांची हवा व त्यांचे फॅन कायम आहेत . आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे . गुरु असायला हवाच . पण आपल्या कडे गुरुला विसरणारे  , गुरु व वडील चोरणारी लोकं निर्माण झाली आहेत. पण संस्कार चोरता येत नाही ते जन्मजात असतात . चांगले संस्कार येण्यासाठी व जपण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद हवे अशी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता केली . 

आपल्या व जैन धर्मियांच्या नात्यात झालेली गैरसमजाची भिंत दूर करायला आलो आहे . पूर्वी पासून आपण सर्व एकत्र राहतोय  व पुढे एकत्र जगायचे आहे. सिंहासन मिळो न मिळो पण तुमची साथ सोबत हवी . तुमच्या हृदयात स्थान हवे . आपण माणुसकी जपत पुढे जाऊ , देश आपला आहे पण कोणी गुलाम बनवणार असेल तर त्यांचे राजकारण मोडून काढायला हवे . वंदे मातरम म्हणायचे आणि ह्या मातेला गुलाम करणाऱ्यां पासून सावध रहा. 

पूजा असली कि तीर्थ प्रसादाला सर्व येतात . कठीण समय असला कि सोबत कोण येते ? संकट असले कि कारणे सांगून लोक दूर पाळतात . आपण बाळासाहेबांचे पुत्र आहोत व संकटाला घाबरत नाही. शत्रू जेवढा जास्त ताकदवर तरी तेवढी त्याच्याशी हिमतीने लढाई जिंकण्याची मजा असते . हि लढाई देखील जिंकणारच . खुर्चीची आभलाषा नाही , माणुसकी महत्वाची व हृदयात जागा हवी . खुर्च्या येतात आणि जातात . बाळासाहेबांना देखील खुची महत्वाची नव्हती . बाळासाहेब सांगायचे कि सर्वानी माणूस म्हणून जन्म घेतला आहे . धर्म नंतर चिकटला आहे . धर्माचा आधार घेऊन देशावर कब्जा करायचा व सर्वाना गुलाम करायचे राजकारण देशात सुरु आहे . आताच आपण सर्वानी डोळे उघडले नाही तर पुन्हा डोळे उघडता येणार नाहीत . त्यामुळे जागे व्हा. 

कोणी आमचे २५ - ३० वर्ष मित्र होते. पण आज ते ज्या रस्त्यावरून चालले आहेत तो मार्ग आमचा नाही . आम्ही जे स्वप्न पहिले होते ते हे स्वप्न व  हिंदुत्व आमचे नाही . प्रत्येकाचा धर्म असतो , प्रत्येकाच्या भावना असतात . पण धर्माच्या नावाने गुमराह करायचे व आपल्या ताब्यात ठेवायचे त्याचा निषेध करण्याची वेळ आली आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी आहे मग देशात का नाही होत ? इकडे महाराष्ट्रात गाईला माता मानायचे  व बाजूच्या राज्यात खाता? अशी टीका करत समान नागरी कायदा हवा जरूर हवा असे ठाकरे म्हणाले. 

पर्यावरण हा महत्वाचा विषय आहे. झाडां - पानांचे व त्यावर अवलंबून असलेल्या जीवांचे पण रक्षण केले गेले पाहिजे . मात्र हल्ली झाडे तोडून रस्ते व विकास केला जातो . रुग्णालयात लवकर पोहचण्यासाठी झाडे तोडून रस्ते बनवण्या ऐवजी रुग्णालयाची गरज लागू नये असा विकास हावा . मुंबईत झाडे कापून एयर प्युरिफायरचे जंगल करणार व त्याला विकास म्हणत आहेत अशी टीका त्यांनी सरकार वर केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमीरा रोडभाजपा