संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या भाळी वनवास; दुरावस्थेकडे सर्वांचेच दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 05:45 AM2024-11-29T05:45:17+5:302024-11-29T05:45:35+5:30
दुरवस्थेची परिसीमा : प्लास्टरची पडझड, भिंतींना बुरशी, सर्वत्र दुर्गंधी
मुंबई - संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले त्यांचा इतिहास भावी पिढीलाही ज्ञात व्हावा यासाठी १४ वर्षांपूर्वी शिवाजी पार्कातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील वास्तूत संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची निर्मिती केली. मात्र, सध्या या दालनाची दुरवस्था झाली आहे. दालनाच्या भिंतींना बुरशी आली असून, कुबट वासाचे साम्राज्य तिथे पसरले आहे. तर कुठे प्लास्टरचीही पडझड झाली आहे.
मुंबई महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे ३० एप्रिल २०१० रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या तीन मजल्यांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा संक्षिप्त इतिहास मांडण्यात आला आहे. २०१० ला हे स्मृती दालन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला लोकांचा ओघ होता. कोरोनाकाळापासून हे दालन पूर्णत: बंद होते. कोरोनानंतर दालन सुरू झाले; परंतु, त्याची कल्पना कोणालाच नसल्याने तिथे भेट देणाऱ्यांचे प्रमाणही घटले आहे.
पार्किंगची जागा
स्मृती दालनाची ही जागा आता वाहन पार्किंगची जागा म्हणून ओळखली जाते. या जागेत मोठ्या प्रमाणात बाहेरील आणि तरण तलावात पोहायला येणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे याठिकाणी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन आहे हे जनतेला आणि पर्यटकांच्या लक्षात येत नाही. या संदर्भात जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.
संयुक्त महाराष्ट्राचा विषय हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या इतिहासाला अशा प्रकारे दुर्लक्षित केले जात असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पालिकेने आणि सरकारने याची डागडुजी व सातत्याने देखभाल करणे आवश्यक आहे.- ओमकार वाघमारे, दालन पाहण्यासाठी आलेले नागरिक