भाऊच्या धक्क्यावरील प्रवेशद्वाराला पोर्ट ट्रस्टचे टाळे; अलिबाग, उरणला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:11 AM2022-06-03T07:11:15+5:302022-06-03T07:11:29+5:30
बेस्ट, टॅक्सीला नो एन्ट्री
मुंबई : मुंबईतील जलवाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या भाऊच्या धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतला आहे. त्यानुसार, गुरुवारी या प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात आले असून, बेस्ट बस, टॅक्सीसह खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अलिबाग आणि ‘जेएनपीटी’ला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
यापूर्वीही भाऊच्या धक्क्यावरील तिकीट काऊंटरनजीक बेस्ट बस वा खासगी वाहने उभी राहायची. आता मात्र, त्यांना मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना चालत हे अंतर पार करावे लागणार आहे. तर, केंद्र सरकार जलवाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत असताना सरकारी अधिकाऱ्यांच्या अशा आडमुठ्या धोरणांमुळे फलनिष्पत्ती होत नसल्याची टीका जलवाहतूकदारांकडून केली जात आहे.
मासेमारीला अटकाव करण्यासाठी घेतला निर्णय
सध्या मासेमारी बंदीकाळ सुरू आहे. या काळात मासेमारी होऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश स्वतः राष्ट्रपतींनी दिले आहेत.असे असतानाही भाऊच्या धक्क्यावर काही जण मासेमारी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आले. मात्र, अनधिकृतपणे मासेमारी होत असल्यास ती रोखण्यासाठी पोलीस वा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची मदत घ्या, असे गेट बंद करून काय साध्य होणार आहे, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.