ऐन उन्हाळ्यात ‘नॉट बेस्ट’ बत्ती गुल, मुंबई घामाघूम; दक्षिण मुंबई परिसराला बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 10:07 AM2024-04-04T10:07:17+5:302024-04-04T10:08:38+5:30
दक्षिण मुंबईतील विविध परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील विविध परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी दुपारी अडीच ते पाच आणि बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान भुलेश्वर परिसरात बत्ती गुल झाली होती. ऐन उन्हाळ्यात मुंबईकर घामाघूम होत असल्याने आणि सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहकांनी बेस्टच्या नावाने बोटे मोडली आहेत.
गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस रात्री दक्षिण मुंबईतील फोर्ट, मरिन लाइन्स, क्रॉफेड मार्केटसह जवळच्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा फटका येथील रुग्णालयांना बसला होता. वीस एक मिनिटात रुग्णालयांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यास बेस्टला यश आले असले तरी उर्वरित परिसरात वीजपुरवठा पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागला होता.
कर्नाक बंदर येथील टाटाच्या फिडरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या कारणात्सव वीजपुरवठा खंडित होत असल्याचे कारण बेस्टकडून सातत्याने पुढे केले जात आहे. तर, दुसरीकडे फिडरपासून पुढे वीज वाहून नेणाऱ्या बेस्टच्या केबलमध्ये बिघाड असल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे चित्र आहे. बेस्टच्या केबल जुन्या झाल्या असून, त्याचा फटका वीज ग्राहकांना बसत असल्याच्या तक्रारींचा पाढा वीज ग्राहकांकडून वाचला जात आहे.