महिलांमध्ये मूत्रमार्गाचे आजार बळावण्याचे प्रमाण चिंताजनक

By स्नेहा मोरे | Published: March 6, 2023 10:15 AM2023-03-06T10:15:11+5:302023-03-06T10:15:40+5:30

पाचपैकी एका महिलेला आजार असल्याचे तज्ज्ञांचे मत

The prevalence of urinary tract diseases in women is alarming health news | महिलांमध्ये मूत्रमार्गाचे आजार बळावण्याचे प्रमाण चिंताजनक

महिलांमध्ये मूत्रमार्गाचे आजार बळावण्याचे प्रमाण चिंताजनक

googlenewsNext

स्नेहा मोरे 
मुंबई : अनेकदा तरुणी आणि महिलांमध्ये खोकताना वा शिंकताना मूत्रविसर्जन होते. त्याचप्रमाणे, बराच वेळ बसून उठल्यानेही मूत्रविसर्जन होते. या स्थितीत झालेले मूत्रविसर्जन हा मूत्रमार्गात झालेला संसर्ग असू शकतो, याविषयी अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात अनभिज्ञता आहे, असे निरीक्षण सायन रुग्णालयाच्या मूत्रविकार तज्ज्ञांनी मांडले आहे. आजही समाजात पाचपैकी एका महिलेला मूत्रमार्गाचे आजार असल्याचे निदान होते. मात्र, वेळेवर निदान न झाल्याने आजाराची गंभीरता वाढते. वेळेवर निदान झाल्यास या आजारांवर नियंत्रण मिळविता येते, अशी माहिती मूत्रविकार तज्ज्ञांनी दिली. 

मुंबई युरोलाॅजी सोसायटी, इंटरनॅशनल इनकाॅन्टिन्टस सोसायटी आणि युरोलाॅजी सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे विद्यमाने सायन रुग्णालयातील युरोलाॅजी विभागाच्या सहकार्याने नुकतीच महिलांच्या मूत्रमार्गाच्या आजारासंबंधी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील ३०० हून अधिक तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता, या परिषदेत दररोज सहा रुग्णांच्या मूत्रविकारांशी निगडित शस्त्रक्रिया पार पडल्या. या परिषदेत केईएम रुग्णालयाच्या युरोलाॅजी विभागाच्या प्रमुख डॉ.सुजाता पटवर्धन, सायन रुग्णालयाचे युरोलाॅजी विभागप्रमुख डॉ.अजित सावंत आणि मूत्रविकार तज्ज्ञ प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी विविध शस्त्रक्रिया केल्या.

मूत्रमार्गाचा संसर्ग हा संपूर्ण मूत्रप्रणालीतील कोणत्याही भागास होऊ शकतो. मूत्रप्रणालीमध्ये मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रवाहक नलिका आणि मूत्रमार्ग या चार घटकांचा समावेश होतो. मूत्रमार्गातील संसर्गामध्ये यापैकी कोणत्याही भागास संसर्ग होण्याचा संभव असतो, परंतु मूत्रमार्गाचा संसर्ग हा मूत्राशय आणि मूत्रमार्ग या मूत्रप्रणालीतील खालच्या दोन भागांना जास्त होताना दिसतो. या संसर्गाचे प्रमाण महिलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येते. संसर्ग मूत्राशयाला झालेला असेल, तर तो अधिकच त्रासदायक होऊन बसतो, अशी माहिती सायन रुग्णालयाचे युरोलाॅजी विभागप्रमुख डॉ.अजित सावंत यांनी दिली आहे. मूत्रमार्गाशी संबंधित संसर्ग व त्यासंबंधी फिश्चुला वगैरे आजारांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये दोन लाख रुपये शुल्क आकारले जाते, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काळजी घेतली, तर अशा प्रकारचे संसर्ग टाळता येऊ शकतात. मूत्रमार्ग संसर्गाची काही लक्षणे आहेत, ज्यावरून संसर्ग झाल्याचे कळू शकते. मूत्राशय सतत भरल्यासारखे वाटणे, सतत लघवीला येणे, मूत्रोत्सर्जन करताना वेदना होणे, लघवीचा रंग गडद असणे, लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण असणे, लघवीचा उग्र वास ये हे त्रास जाणवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेत योग्य उपचार करावे.
डॉ. अजित सावंत, 
युरोलाॅजी विभागप्रमुख, सायन रुग्णालय.

Web Title: The prevalence of urinary tract diseases in women is alarming health news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य