शेतमालाचे भाव नियंत्रित करणार; सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला मुंडेंचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:02 AM2023-07-21T08:02:45+5:302023-07-21T08:03:04+5:30
कृषिमंत्री धनंजय मुंडे; सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला दिले उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतमालाचे भाव कधी पडतात तर कधी गगनाला भिडतात. आता टोमॅटोच्या बाबतीतही तेच घडत आहे. त्यामुळे बियाणांची विक्री, पेरा आणि उत्पादन यांचा मेळ घालून बाजार नियमन करावे लागेल, त्यासाठी समन्वय आणि नियंत्रण यंत्रणा उभारू, अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
सत्ताधारी पक्षाचे आमदार किरण लहामटे यांनी आणलेल्या २९३ च्या प्रस्तावान्वये चर्चेला उत्तर देताना त्यांनी सरकारची बाजू मांडली. आत्मा आणि स्मार्ट यासारख्या प्रकल्पांचे डिजिटायझेशन करून सेंटर ऑफ एक्सलन्स फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करण्यार असल्याचे त्यांनी सांगितले.
एक रुपयात पीकविमा फसवी आहे, असे मत अनेकांनी मांडले. त्यावर मागील वर्षी ही योजना सुरू होण्याआधी शेतकऱ्यांनी ६५५ कोटीचा प्रीमियम भरला. आता ही जबाबदारी सरकारने घेतली आहे. याचे कौतुक करण्याऐवजी अभ्यास न करता टीका केली जाते, असे मुंडे म्हणाले.
सर्वांना मिळेल पीकविमा
अनेक जिल्ह्यात पीकविमा नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेऊन सर्वांना पीकविमा मिळेल, अशी व्यवस्था करू. ‘पीएम किसान’साठी ८५ लाख ८५ हजार शेतकरी पात्र आहेत. हे सर्व नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, असे मुंडे म्हणाले.