Join us

"पंतप्रधानांनी कुठेही जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 9:16 PM

राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील भाजप सरकारवर टीका केली.   

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनाचा आणि रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी भाषणं करताना पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल आणि राष्ट्रवादी हाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, यासाठी जोमाने काम करण्याचा सूर आवळला. यावेळी, मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत कुठलीही जबाबदारी द्या, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली. तर, इतरही नेत्यांनी आपापली मते मांडली. राष्ट्रवादीचे प्रमुख आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील भाजप सरकारवर टीका केली.   

आज पक्षाच्या २४ व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्ष सहकाऱ्यांशी संवाद साधताना राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर शरद पवार यांनी टीका केली. मणिपूर येथे मागील ४५ दिवस सतत दंगली होत आहेत. केंद्र सरकार ज्याप्रमाणे मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांना पाहत आहे त्यातून तिथल्या लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्याने आम्ही या देशाचे नागरिक आहोत का? असा प्रश्न पत्राद्वारे केला. लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना असे वाटत असेल तर सामान्य माणसांची अवस्था काय असेल? देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे जायचे तिथे जावे, पण देशातील अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त त्यांनी करावा, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच, ते करण्यासाठी सत्तेचा वापर केला जात नाही, असा टोलाही मोदी सरकारला लगावला. 

महिला संरक्षणासाठी राज्यकर्ते काय करतात?

कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. मात्र आज समाजा-समाजात जाणीवपूर्वक कटुता कशी निर्माण होईल याची खबरदारी राज्यकर्त्यांकडून घेतली जाते. हे यापूर्वी कधी होत नव्हते. महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य असतानाही याठिकाणी दंगल होते. याचा अर्थ सत्ताधारी पक्षाची शक्ती जिथे नाही तिथे जातीय तणाव निर्माण करून त्याचा राजकीयदृष्ट्या लाभ कसा होईल हे पाहिले जात आहे. ढिसाळ कायदा व सुव्यवस्था हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. समाजातील लहान घटकांना संरक्षण द्यायचे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. माहिती घेतली असता महाराष्ट्रात या वर्षात तीन हजार एकशे बावन्न मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी आजचे राज्यकर्ते काय करत आहेत यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. 

महाराष्ट्रात लोकांनी पक्षाला ताकद दिली 

२४ वर्षांपूर्वी या सभागृहामध्ये छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आपण मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करावा हा निर्णय आपण घेतला आणि संध्याकाळी लाखोंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कला त्यास जनतेचा पाठिंबा मिळाला. त्या दिवसापासून आपण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणातील एक घटक होऊन बसलो. महाराष्ट्रात लोकांनी आपल्याला शक्ती दिली, सत्ता दिली. २५ वर्षांच्या कालखंडात अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सत्तेचा वापर केला, असे पवार यांनी म्हटले. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईनरेंद्र मोदीमणिपूर हिंसाचार