Join us  

रेल्वे रुळांच्या बाजूच्या कचऱ्याचे करायचे तरी काय? मध्य रेल्वे प्रशासनाला भेडसावतोय प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 10:28 AM

मुंबईत रेल्वे रुळांजवळ जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मुंबई :मुंबईत रेल्वे रुळांजवळ जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला ते कॉटनग्रीन या ठिकाणी रेल्वे मार्गांजवळील कचरा उचलल्यानंतरही पुन्हा जमा होतो. या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न मध्य रेल्वे प्रशासनाला भेडसावत आहे.

मध्य रेल्वेमार्गावरील कचऱ्याचे प्रमाण पश्चिम रेल्वेच्या तुलनेत जास्त आहे. विक्रोळी-कांजूरमार्ग, पारसिक बोगद्यासह लगतचा परिसर, मानखुर्द-गोवंडी, डोंबिवली-कोपर आदी ठिकाणांचा समावेश आहे. हा कचरा उचलण्यासाठी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर दररोज रात्री रेल्वेतर्फे तीन गाड्या चालविल्या जातात. हा कचरा उचलल्यानंतरही तितकाच कचरा आजूबाजूच्या वसाहतीतून रुळांवर पुन्हा टाकण्यात येतो, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर रेल्वे रुळांच्या बाजूच्या गटारातील कचरा तेथून उचलून त्याची विल्हेवाट न लावता रेल्वे रुळांच्या उंचवट्यावरच ठेवला जातो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेल्वेकडून कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न होत असले तरी पालिकांकडून त्याविषयी फारशी सकारात्मक भूमिका नसल्याचे जाणवते. पारसिक बोगद्याकडे रुळांच्या बाजूला आतापर्यंत तीन वेळा भिंतीची उंची वाढविण्यात आली. पण, तरीही रुळांवर वारंवार कचरा येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

संपूर्ण स्वच्छतेला प्राधान्य कधी? 

मध्य रेल्वेने स्थानकांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमले असून, त्यांची संख्या आणखी वाढणार आहे. मात्र, रुळांलगत गटारातील कचरा काढून ठेवण्यात आल्याने पावसाच्या पाण्याने हाच कचरा परत वाहून गटारात जातो. 

त्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी तुंबत असल्याचे दिसते. हा कचरा रुळालगत न टाकता तेथून उचलून त्याची दुसऱ्या ठिकाणी विल्हेवाट लावली पाहिजे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने सतत होणाऱ्या पावसात कचरा वाहून गटारांमध्ये येत आहे. लोकलच्या रुळांशेजारील गटारातील कचरा काढण्यात आला आहे. त्या जागेतून हा कचरा कर्मचाऱ्यांकडून स्पेशल गाडीने लवकरच उचलला जाईल. प्रवाशांनी लोकल प्रवासादरम्यान प्लॅस्टिक कचरा रुळांवर टाकू नये. तसेच रुळांशेजारील वस्ती असलेल्या नागरिकांनी रुळांवर कचरा टाकणे बंद करावे, असे आवाहन रेल्वेकडून करत आहोत.- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

रेल्वे रुळांजवळ कचरा होणारी ठिकाणी-

मध्य रेल्वे:

१) भायखळा ते सँडहर्स्ट रोड स्टेशन

२) विक्रोळी ते कांजूरमार्ग 

३) पारसिक बोगदा

४)कोपर ते डोंबिवली

हार्बर मार्ग:

 १) मानखुर्द ते गोवंडी

 २) कुर्ला ते कॉटनग्रीन 

 ३) वांद्रे ते वडाळा

पश्चिम रेल्वे :

१) माटुंगा रोड

 २) माहीम

  ३)  वांद्रे

टॅग्स :मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकचरा प्रश्नमाहीम